आकाश कंदिलांची खरेदी सुरू : आकाश कंदिलांना पौराणिक महत्त्व : दीडशेपासून पाच हजारपर्यंत किमतीचे आकाश कंदील बाजारात
प्रतिनिधी / बेळगाव
दिवा हे जसे प्रकाशाचे प्रतीक आहे, तसेच मांगल्याचे प्रतीक आहे. मनुष्य नेहमी सुखसमृद्धीची कामना करतो. त्यासाठी कष्टाने तो प्रगती साध्य करतो. प्रगतीचा आलेख नेहमी चढता राहावा हे सुचित करणारे दिवाळीतील महत्त्वाचे प्रतीक म्हणजे आकाश कंदील होय. आकाश कंदील लावण्यामागे अनेक कथा आहेत. आकाश कंदिलांमध्ये अनेक नमुने उपलब्ध झाले तरी पारंपरिक करंजीचा आकाश कंदील हा आजही स्थान टिकवून आहे.
दिवाळीत फराळामध्ये करंजी आवर्जून केली जाते. विवाहप्रसंगी ती करावीच लागते. जाणत्या महिलांच्या सांगण्यानुसार करंजी ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. करंजीला चिरण्याने कापल्यानंतर परत पीठ उरते. महिला त्याला व्याज संबोधतात. म्हणजेच एक करंजी झाली तरी पुन्हा पीठ उरते आणि दुसऱया करंजीसाठी वापर केला जातो. करंजीमध्ये भरगच्च सारण भरले जाते. थोडी आश्चर्याची बाब आहे. पण ग्रामीण भागामध्ये आणि लोककलांमध्ये करंजीला ‘पोटूशी’ म्हटले जाते.
पावसाळा संपून नवी पिके हाती येतात. बळीराजाला काहीशी उसंत मिळते. आलेले पीक हे समृद्धीचेच लक्षण आहे. तो आनंद साजरा करण्यासाठी आकाश कंदील लावले जातात. रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परतले. त्याचा हर्ष प्रजेने दीप लावून साजरा केला. तेव्हापासून आकाश दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली, असेही मानले जाते.
वंशवृद्धीमुळेच हे सृष्टीचक्र अखंड राहते. म्हणूनच आकाश कंदिलांवर करंजीचे प्रतीक पाहायला मिळते, त्याचे हेच कारण होय. काळानुरुप आकाश कंदिलांमध्ये बदल झाले. परंतु पारंपरिक आकाश कंदील आणि चांदणी यांना मागणी आहेच. चांदणी हेसुद्धा प्रकाशाचेच प्रतीक आहे. बेळगाव बाजारपेठेत पारंपरिक आकाश कंदिलांना अधिक मागणी आहे. आज आधुनिक आकाश कंदिलांचा वापर दिवाळीमध्ये आकाश कंदील व नंतर लॅम्प शेड म्हणून केला जातो.
शहरातील बुरुड गल्ली ही आकाश कंदील तयार करण्याचे आणि विक्रीचे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील मोहन कोरडे कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. 50 वर्षांहून अधिक काळापासून त्यांच्या कुटुंबात आकाश कंदील तयार केले जातात. वडिलोपार्जित हा व्यवसाय असूनही त्याचे प्रशिक्षण असे कोणी घेतलेले नाही. कोरडे यांच्या आकाश दिव्यांचे वैशिष्टय़ म्हणजे चांदणी आणि करंजीचा आकाश कंदील होय. काही वर्षांपासून या पारंपरिक आकाश कंदिलांबरोबरच त्यांनी पारदर्शी कागद वापरून आकाश कंदील तयार करण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्याकडे दीडशेपासून 5 हजार रु.चे आकाश कंदील आहेत. हे महागडे आकाश कंदील एमएलआयआरसी, केएलई यांच्यासाठी खास बनविले जातात. त्यासाठी दुहेरी कागद वापरला जातो. काही आकाश कंदिलांवर त्यांनी हेतुतः भगव्या ध्वजाची प्रतिकृती गोलाकार लावली आहे. संपूर्ण पिवळय़ा रंगाचा आकाश कंदील हे आणखी एक वैशिष्टय़. बेळगावचे सिदनाळ कुटुंब फक्त पिवळय़ा रंगाचाच आकाश कंदील लावतात. त्यामुळे कोरडे यांचे ग्राहक ठरलेले आहेत.
बुरुड गल्लीत नजर टाकता पारंपरिक आकाश दिव्यांबरोबरच प्लास्टिकचे रंगीबेरंगी, कागदी, कापडी आकाशदिवे पाहायला मिळतात. काही विपेत्यांनी बांबूच्या आकाश कंदिलांची निर्मिती केली आहे. बांबूचा वापर करून कापडी लेस लावून सजावट केली आहे. मात्र अद्याप तरी तेजीने आकाश दिव्यांची खरेदी झाली नाही, असे विपेत्यांचे म्हणणे आहे. कोरोनाने आपल्याला फार मोठा आर्थिक फटका दिला, असेही ते सांगतात.
फ्लुरोसेंट हंडी, मेटॅलिक हंडी, मार्बल पेपरचे दिवे, फोल्डींगचे कंदील असे वैविध्यपूर्ण नमुने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, यंदा कोरोनाने निर्माण केलेले संकट विस्मरणात गेले नसल्याने ग्राहकांनी चिनी आकाश कंदिलांकडे पाठ फिरविली आहे.
आकाश कंदील…
- मांगल्याचे आणि प्रगतीचे प्रतीक
- करंजीच्या आकाश कंदिलांना मागणी
- दीडशेपासून 5 हजारपर्यंत आकाश कंदील उपलब्ध
- बांबूचे आकाश कंदील प्रथमच दाखल
- चिनी आकाश कंदिलांकडे ग्राहकांची पाठ