दारूच्या नशेतील रिक्षाचालकाने दिली जबर धडक
वार्ताहर/ केपे
पारोडा येथे शनिवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या मालवाहू रिक्षाच्या चालकाने विरुद्ध दिशेने जाऊन दुचाकीचालकाला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. रिक्षाचालक मडगावहून केपेच्या दिशेने जात होता, तर विजय पैंगीणकर (वय 49) हा मोटारसायकलचालक आपल्या बहिणीला सोडण्याकरिता केपे येथे आला होता आणि तेथून तो मडगावच्या दिशेने जात होता, अशी माहिती केपे पोलिसांनी दिली.
पारोडा येथे दुपारी 12.30 च्या दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने दुचाकीचालकाला धडक दिली. ती धडक इतकी तीव्र होती की, दुचाकीचालक सरळ जाऊन बाजूला शेतात पडला व त्यानंतर त्या रिक्षाने पुढे एका माडालाही धडक दिली व रस्त्यावर कलंडली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला, तर रिक्षाचालक सुदेश देसाई (वय 45-शेल्डे) हाही जखमी झाला आहे. त्याला उपचारांकरिता इस्पितळात पाठवले आहे. यासंबंधी केपे पोलिसांनी पंचनामा करून पुढचा तपास केपे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
चांगला लोककलाकार गमावला
पैंगीणकर हे अबकारी खात्यामध्ये कामाला होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते मूळ पैंगीण येथील असून दाडेवाडा, मडगाव येथे राहत होते. ते उत्कृष्ट लोककलाकार म्हणून परिचित होते आणि राष्ट्रीय पातळीवरही आपली कला सादर केली होती. ते उत्कृष्ट गायक, शामेळवादक, घुमटवादक होते. त्यांचे वडीलही उत्कृष्ट हार्मोनियमवादक होते व त्याचे बंधू तबलावादक आहेत. पैंगीणकर यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून अनेकांनी दुःख व्यक्त केले. ही घटना ऐकून धक्का बसला असून अत्यंत दुःख झाले आहे. विजय हे एक उत्कृष्ट लोककलाकार होते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली कला सादर केली होती. आम्ही एक चांगला कलाकार गमावला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पैंगीणकर यांनी व्यक्त केली.