वकिलांनी न्यायालयीन इमारतीस केला विरोध
प्रतिनिधी/ बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. खुल्या जागेमध्ये मोठी न्यायालयीन इमारत उभे करण्यात येत आहे. या इमारतीमध्ये पार्किंगची सोय करावी, अशी मागणी वकिलांनी मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे केली होती. त्यांनी आश्वासनही दिले होते. मात्र कंत्राटदाराला विचारले असता पार्किंग साठी जागा नसल्याचे सांगितले. यामुळे वकिलांनी ते काम बंद पाडविले आहे. प्रथम पार्किंगची सोय करा त्यानंतरच कामाला सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. दुचाकी प्रमाणेच आता चार चाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात जागा मिळणे कठीण झाले आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात यापूर्वी लोकअदालतच्या इमारतीसमोर खुली जागा होता. त्या ठिकाणी पार्किंग केले जात होते. पण आता त्याठिकाणी भव्य इमारत उभी करण्यात येत आहे. विविध न्यायालयांसाठी ही इमारत बांधण्यात येत आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे.
इमारतीचे काम सुरु करताच वकिलांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन तळ मजल्यामध्ये वकिलांसाठी पार्किंगची सोय करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी न्यायाधीशांनी पार्किंगची सोय करु, असे आश्वासन दिले होते. सध्या या इमारतीचे कॉलम उभे करण्यात आले आहे. याचबरोबर मातीचा भरावही टाकण्यात आला आहे. यावेळी काही वकिलांनी पार्किंगसाठी सोय आहे की नाही याची चौकशी केली असता कंत्राटदाराने पार्किंगला जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वकिलांनी इमारतीला विरोध केला आहे.
पार्किंगची सोय करा, त्यानंतरच काम सुरु करा, असे सुनावण्यात आले आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, ऍड. एम. एन. कुलकर्णी, ऍड. गिरीश पाटील, ऍड. सुनील काकतकर, ऍड. संतोष गडकरी, ऍड. श्रीधर मुतकेकर, ऍड. संजय पाटील, ऍड. प्रमोद नागनूर, ऍड. अशिष कट्टी, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. सुधीर गावडे, ऍड. भगतसिंग रोकडे, ऍड. दयानंद पचंडी, ऍड. इरफान बयाल, ऍड. लखन नौखंडकर, ऍड. विकास मुलीमनी, ऍड. प्रवीण सांबरेकर, ऍड. रेहमान नदाफ, ऍड. संदीप माळी, ऍड. जुनेद इनामदार, ऍड. व्ही. सी. अवटी, ऍड. प्रमोद जाधव, ऍड. विशाल पाटील, ऍड. श्री कुलकर्णी यांच्यासह वकील उपस्थित होते.