प्रतिनिधी/ सातारा
आर्चरी प्रकारात ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या सरडे (ता. फलटण)च्या तिरंदाज प्रवीण जाधवने टोकिओत कडा संघर्ष केला. पण, पदकाने त्याला हुलकवणीच दिली होती. मात्र, प्रवीण जाधवच्या प्रतिकूल परिस्थितीतील संघर्षाने सर्वांचीच मने जिंकली अन् सातारा जिल्हय़ाचे नाव जागतिक पातळीवर झळकले. त्याच्या संघर्षाला सोनेरी किनार लावत साताऱयातील पार्थ सुशांत साळुंखे या तिरंदाजाने युरोपातील पोलंड येथे सुरु असलेल्या युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा निशाणा साधला आहे.
पार्थ साळुंखे हा करंजे येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या आर्चरी प्रशिक्षण केंद्राचा तिरंदाज खेळाडू असून तिरंदाजी प्रकारात जागतिक पातळीवर सुवर्णपदक पटकावणारा तो जिल्हय़ातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. युरोपमधील आर्चरी स्पर्धेतील यशामुळे त्याची अमेरिकेत होणाऱया जागतिक खुला गटातील आर्चरी स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली असून त्याच्यावर सातारकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पुरुष एकेरीत खेळणारा महाराष्ट्राचा व सातारा जिल्हय़ाचा सुपुत्र तिरंदाज प्रवीण जाधव याने चांगली सुरुवात करत पहिला सामना 6-0 च्या फरकाने जिंकला. त्याने जगातील नंबर 2 चा खेळाडू असणाऱया आरओसी संघाच्या गालसन बाजारझापोव याला मात देत दुसऱया फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर दुसऱया फेरीत मात्र जगातील नंबर एकचा तिरंदाज असणाऱया अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने जाधवला नमवत स्पर्धेबाहेर केलं.
पहिल्या सेटपासूनच ब्राडीने सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या सेटमध्ये ब्राडीने 28 गुण मिळवले. तर जाधव 27 गुण मिळवल्याने पिछाडीवर पडला. ज्यामुळे सामन्यात ब्राडीने 2-0 ची आघाडी घेतली. दुसऱया सेटमध्ये ब्राडीने 27 गुण मिळवले तर प्रवीण जाधव 26 गुणच मिळवू शकला. त्यानंतर अखेरच्या निर्णायक सेटमध्ये ब्राडीने 26 आणि प्रवीणने 23 गुण मिळवल्याने या पराभवासह जाधवची यंदाच्या ऑलिम्पिकमधील यात्राही संपली.
मात्र, देशात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सुरु असताना युरोपमधील पोलंड येथे युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघातून पुरुष गटात सातारचा पार्थ साळुंखे नेमबाजीचे कौशल्य पणाला लावत होता. स्वातंत्र्यदिनीच त्याने मिश्र गटात सुवर्णपदकाला गवसणी घालत देशासह जिल्हय़ाचे नाव रोशन केले. प्रवीण जाधवला पदकाने हुलकवणी दिली पण पार्थने सुवर्ण पदक पटकावून तो लवकरच अमेरिकेत होणाऱया सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आर्चरी स्पर्धेत खुल्या गटातील स्पर्धकांना भिडणार आहे.
शिक्षण प्रसारक संस्थेने पाडले पैलू
सुवर्ण पदकाला गवसणी घातलेला पार्थ साळुंखे करंजे येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. तो सध्या यशोदा शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र तो करंजेतील शिक्षण प्रसारक संस्थेने विकसित केलेल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे. तिथेच त्याच्यावर पैलू पाडण्याचे काम सुरु असून त्यातूनच त्याने थेट युरोपमध्ये जावून देशासह जिल्हय़ाच्या नावाचा डंका वाजवला आहे.
शिक्षक असलेले वडीलच प्रशिक्षक
पार्थ साळुंखे हा श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये असलेल्या अष्टपैलू शिक्षक सुशांत साळुंखे यांचा मुलगा आहे. आर्चरीचे प्रशिक्षण त्याला खुद्द शिक्षक असलेल्या वडिलांकडूनच मिळत असून 18 व्या वर्षात पदार्पण करत असताना त्याने परदेशात जावून मिळवलेल्या यशामुळे शिक्षण प्रसारक संस्थेच्या आर्चरी प्रशिक्षण केंद्राच्या वाटचालीलाही चार चाँद लागलेले आहेत. संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्यामंदिर, इंग्लिश मेडियम स्कूल व कासट बालक मंदिर या चारही शाखातील शेकडो विद्यार्थी येथे आर्चरीचे प्रशिक्षण घेत असून त्यांना सुशांत साळुंखे यांच्यासारखा प्रशिक्षक लाभलेला आहे.