लॉकडाऊनमध्ये 82 वर्षानंतर विक्रम, बाजारात हिस्सा 5 टक्के वाढला
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
कोरोनाने गेल्या दोन ते तीन महिन्यात अनेकांना मारलं असलं तरी पार्लेजी कंपनीला मात्र तारलं असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये पार्लेजीने सर्वाधिक बिस्कीटे विकण्याचा विक्रम केलाय. हा विक्रम तब्बल 82 वर्षांनंतर केला जात असल्याचा दावा कंपनी करते आहे.
5 रुपयाचा बिस्किट पुडा तर शेकडो किलोमीटर चालत जाणाऱयांना पोटाला आधार देऊ शकला आहे. काहींनी बिस्किटे स्वत:करिता खरेदी केली तर काहींनी दुसऱयांना मदतीसाठी घेतली. अनेक घरमालकांनी तर लॉकडाऊनच्या काळात खबरदारी म्हणून पार्लेजी बिस्किटांचा भला मोठा स्टॉकच करून ठेवला असल्याचेही समोर आले आहे.
82 वर्षानंतर विक्रम
साधारण 1938 मध्ये पार्लेजी कंपनीचा ब्रँड लोकप्रिय झाला. लॉकडाऊनच्या काळात तर या ब्रँडच्या बिस्किट विक्रीने या आधीचे सर्व विक्रीचे विक्रम मागे टाकले. पार्लेजीने विक्री संख्या स्पष्ट केलेली नसली तरी त्यांनी मार्च, एप्रिल व मे महिन्यात झालेली विक्री 82 वर्षांनंतर विक्रमी झाली असल्याचे म्हटले आहे.
कंपनीचा बाजारातील हिस्सा 5 टक्के वाढला असून 80 ते 90 टक्के विकास हा पार्लेजीच्या विक्रीमुळे झाला आहे. संघटीत क्षेत्रात कार्य करणाऱया पार्लेजी कंपनीने लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याचे कळताच लागलीच निर्मिती कार्यावर जोर दिला. प्रसंगी आपल्या कर्मचाऱयांना घरी सोडण्याचीही व्यवस्था केली. जेव्हा कारखाने सुरू झाले तेव्हा कंपनीने लागलीच मागणीयुक्त उत्पादनांच्या निर्मितीत पुन्हा झोकून दिलं.
या सोबत लॉकडाऊन काळात ब्रिटानियाची गुडडे, टायगर, मिल्क बिस्किटस, ब्रो बॉन व मॅरी बिस्किटे तसेच पार्ले क्रॅकजॅक, मोनॅको, हाइड अँड सीक अशी बिस्किटेही उत्तम खपली असल्याचे जाणकार सांगत आहेत.