एकवीसाव्या वर्षापासून संघ-भाजपशी जोडलो : पार्सेकरांना तृणमुलकडून ऑफर्स,आप,शरद पवारांचीही ऑफर धुडकाविली
प्रतिनिधी /पणजी
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस बरोबरच सत्ताधारी भाजप नेत्यांशीदेखील संपर्क साधला असून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरदेखील देण्यात आली. तथापि आपण वयाच्या 21 व्या वर्षांपासून भाजपचे कार्य करतोय आणि आपण एक शिक्षक आहे. स्वार्थासाठी वाटेल तसा वागणारा मी नाही, असे स्पष्ट बजावून त्यांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला.
तृणमूल काँग्रेसचे काही नेते गोव्यात ठाण मांडून बसलेले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या ते संपर्कात आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी त्या व्यक्तीकडे निवडणुकीत आवश्यक खर्च करण्याची तयारी आहे की नाही, हा एक मुख्य मुद्दा असतो. पक्षीय पातळीवरुन उमदेवारांना फारशी मदत मिळत नाही. तथापि अनेकजण या पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतो.
काँग्रेस नेतृत्वावरचा विश्वास उडाला
तृणमूल काँग्रेसच्या जाळय़ात अनेक जण अडकले आहेत. आलेमाव कुटुंबातील काही नेते मंडळीही लवकरच पक्षात रुजू होणार आहेत. संपूर्ण गोव्याला आश्चर्याचा धक्का बसला तो काँग्रेसच्या प्रतापसिंह राणे यांच्यानंतर ज्येष्ठ नेता असलेल्या व दोन वेळा मुख्यमंत्रिपदी आरुढ झालेला नेता लुईझिन फालेरो यांच्या निर्णयाने. त्यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशाने राज्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षाच्या नेत्यांवरचा विश्वास उडाला.
पार्सेकरांना ऑफर्सच ऑफर्स!
एका बाजूला काँग्रेस पक्षातील ही परिस्थिती आणि दुसऱया बाजूला भाजपचे वरिष्ठ आणि पक्षाच्या गोव्यातील काही नेत्यांनी बाजूला ठेवलेले माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांना दोन आठवडय़ांपूर्वी तृणमूलच्या नेत्यांनी चर्चेला बोलाविले होते. त्यांनी जाण्यास नकार दिला. परंतु, हट्टाला पेटलेल्या नेत्यांनी त्यांचे घर गाठले व त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना बऱयाच मोठय़ा ऑफर्स देण्यात आल्या. मुख्यमंत्रिपद शिवाय ते सांगतील, सूचवतील ते उमेदवार ठरविण्यात येतील. त्याचबरोबर संपूर्ण गोव्यातील उमेदवारांचा सारा खर्च पक्ष करणार अशीही ऑफर दिली.
एकवीसाव्या वर्षापासून संघाशी जोडलो
पार्सेकरांनी तृणमुल नेत्यांचे सारे ऐकून घेतले. पार्सेकर म्हणाले की, आपण भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. वयाच्या 21 वर्षांपासून आपण संघाशी, भाजपशी आणि संघाशी जोडले गेलेलो आहे. आपण शिक्षकदेखील आहे. तेव्हा आपण कधीही तत्वांशी तडजोड करून स्वार्थासाठी वाट्टेल ते करणाऱयांपैकी नाही. पार्सेकरांना केलेल्या सर्व विनविण्या वाया गेल्यानंतर तृणमुलवाले अशीच ऑफर घेऊन लुईझिन फालेरो यांच्याकडे गेले.
आप, शरद पवारांचीही ऑफर धुडकावली
आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द राष्ट्रवादी नेते शरद पावर यांचा उजवा हात असलेल्या एका वरिष्ठ नेत्यानेही पार्सेकर यांना बोलावून ऑफर दिली. त्यांनी ती फेटाळून लावली. ‘आप’ नेही त्यांना गोव्याचा प्रमुख नेता बनविण्याचा ठरविले आणि त्यांना ऑफरही दिली. त्यांची ऑफरदेखील पार्सेकरांनी धुडकावून लावल्याचे वृत्त आहे.
दरम्यान तृणमूलच्या नेत्यांनी भाजपमध्ये नाराज काही मंत्री व आमदारांशीदेखील संर्पक साधलेला आहे. पुढील काही दिवसांत भाजपमधील काही नेते तृणमूलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. एका महत्त्वाकांक्षी मंत्र्याला तृणमूलने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलेली आहे. त्यांनी थोडे दिवस थांबा, असे कळविल्याचे वृत्त आहे.
होय, मी तत्वांशी व पक्षाशी बांधिल आहे :पार्सेकर
लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्याला तृणमूलच्या काही नेत्यांनी घरी येऊन ऑफर दिली. परंतु, राजकारण हा माझा व्यवसाय नाही. आपण संघातून सेवा बजावित भाजपमध्ये पोहोचलो. सेवा हे व्रत म्हणून स्वीकारलेले आहे. आपण शिक्षक आहे. यापूर्वी मुख्यमंत्रिपदी होतो. आपण अशा ऑफर्स स्वीकारल्या असत्यातर ज्या पदावर होतो, त्याच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत का? मला कोणताही स्वार्थ नाही. माझे कार्य हे भाजपचे पक्षश्रेष्ठी जाणून आहेत. मला पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक म्हणून राहायचे आहे. त्यामुळे आपल्याला आलेल्या ऑफर्स माझ्या पक्षाच्या तत्वांपुढे व शिक्षक या नात्याने फिजूल वाटतात, असे लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.