अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम
प्रतिनिधी /पणजी
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाविरोधात बंड पुकारु नये यासाठी आणि त्यांची समजूत काढण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पार्सेकरांच्या भेटीसाठी त्यांच्या हरमल या गावी पोहोचले. तथापि माझा आता नाईलाज झाला अशी टिपण्णी करुन त्यांनी फडणवीस यांचा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दर्शविला आणि आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारच असा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
पार्सेकर यांच्या भेटीसाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हात हलवत परत यावे लागले. फडणवीस यांनी पार्सेकर यांना आपण भाजपचे ज्येष्ठ नेते आहात, तेव्हा कृपा करुन पक्ष सोडून जाऊ नका, तुमच्या मार्गदर्शनाची पक्षाला व कार्यकर्त्यांना गरज आहे तसेच तुम्हाला आवश्यक असे पदही देण्यात येईल असे सांगितले.
तथापि, आपली पक्षामधील काही पदाधिकाऱयांनी कशी विचित्र हालत करुन ठेवली आहे याबाबतचा सविस्तर पाढा पार्सेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वाचला. पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांच्याबाबतही त्यांनी तक्रार केली. आपण पक्ष सोडून जात असताना आपल्याला अत्यंत दुःख होत आणि सहनशीलतेचा देखील अंत होत आहे, यामुळे आपला नाईलाज आहे. आपण पक्ष वाढीसाठी कसे कसे प्रयत्न केले होते याबाबतची सविस्तर माहिती फडणवीस यांना पार्सेकर यांनी दिली. शेवटी फडणवीस यांनी पार्सेकर यांना पटवून देण्यासाठी सारे प्रयत्न व्यर्थ ठरल्याने ते पणजीकडे रवाना झाले.