जनसंपर्क अभियानाला प्रारंभ, मांद्रेतून विजयी होण्याचा कार्यकर्त्यांना विश्वास, भाजप उमेदवारीवर केले शिक्कामोर्तब, समर्थक-कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी /मोरजी
2022 च्या विधानसभा निवडणुकीतील अधिक 22 जागांचा प्रारंभ मांद्रेतून करण्याचा संकल्प करीत सोमवारी आमदार दयानंद सोपटे यांनी आपले ग्रामदैवत असलेल्या भगवती देवीला सुवर्णहार आणि श्रीफळ अर्पण करून प्रचार कार्याला अधिकृत प्रारंभ केला. मांदेतील आपल्या भाजप उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने सोपटे समर्थक कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून सोपटे यांच्या विजयाचा निर्धार केला तसेच राज्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला.
पार्से येथील श्री भगवती देवीच्या प्रांगणात या जनसंपर्क अभियानाला आमदार दयानंद सोपटे यांच्या सोबत भाजपचे राज्य कार्यकारिणी सचिव तथा मांदे मतदार संघ प्रभारी गोरख मांदेकर, उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांदेकर, डिचोली मतदारसंघाचे भाजप पदाधिकारी नरेश कडकडे, मांदे भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब, सचिव सुदेश सावंत, संतोष कोरखणकर, महिला मोर्चा अध्यक्ष दीपा तळकर, सूचना गडेकर, नयनी शेट गावकर, किसान मोर्चा अध्यक्ष दत्ताराम ठाकूर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, केरी सरपंच सुरज तळकर, हरमल सरपंच मनोहर केरकर, आगरवाडा चोपडे सरपंच भगीरथ गावकर, तुये सरपंच सुहास नाईक, विनोर्डो सरपंच अपर्णा परब पार्से सरपंच प्रगती सोपटे, उपसरपंच अमित शेटगावकर, विलास मोर्जे, पवन मोर्जे, तुषार शेटगावकर, डेनिस ब्रिटो, संतोष बर्डे, सागर तिळवे, संज्योत नारोजी, युवा मोर्चा मांदे-रामा नाईक, राजन फरास, प्राजक्ता कन्नाईक, एकता चोडणकर, बाबली राऊत, आबा गडेकर, धनंजय शेटगावकर यांच्यासह विविध पंचायतीचे पंच, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मांदे मतदारसंघातील भाजपची उमेदवारी अजून कुणालाच जाहीर झाली नसली तरीही मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से येथून जनसंपर्क अभियानाला सुरुवात करताना शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी अनेक वक्त्यानी 2022 च्या निवडणुकीत आमदार दयानंद सोपटे विजयी होण्याबरोबरच मंत्री होतील असा विश्वास व्यक्त करून अनेक कार्यकर्त्यांनी भाई सोपटे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणानी शेकडो कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला.
मांदे मतदारसंघाची भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी एका बाजूने माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे उमेदवारीसाठी धडपडत असतानाच आमदार दयानंद सोपटे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार्से येथील आपल्या ग्रामदेवता श्री भगवती देवीला सुवर्णहार आणि श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा अर्थात जनसंपर्क माहिमेला सुरुवात करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे दिसून आले.
एका गरीब कुटुंबात आपण जन्माला आलो. आपण सर्वांनी मला मोठा केलात याची जाण ठेवूनच देवी भगवतीच्या आशीर्वादाने जनसेवा करीत आहे. यापुढे ही करीत राहीन. आजच्या उपस्थितीतून आपले प्रेम दिसून आले. चार वेळा आमदार झालो. एकदा तर जनतेसाठी आमदारकीचा त्याग करून पुन्हा निवडणूक लढवून आपल्या सर्वांच्या सहकार्यावर विजयी झालो. एक प्रकारे आपल्या सत्व परीक्षेला पात्र ठरलो. आज राज्यातील एक कार्यक्षम आमदार होवू शकलो. माझ्या विजयाने ही उमेदवारी सार्थ कराल असा मला विश्वास आहे, असे यावेळी सोपटे म्हणाले.
प्रगती पुस्तकात मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ आमदार सोपटे : गोरख मांदेकर
भाजपा मांदे निरीक्षक गोरख मांदेकर यांनी बोलताना भाजपचे आमदार म्हणून विकासाच्या बाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रथम क्रमांकावर आणि मांदेचे आमदार हे विकासाच्या बाबतीत दुसऱया क्रमांकावर आहेत. 2022 च्या निवडणुकीत भाजपचे 26 उमेदवार विजयी होतील व आमदार दयानंद सोपटे हे मंत्री असतील. त्यांची उमेदवारी पक्की झाल्याचेही सांगितले.राजन कडकडे, समीर मांदेकर, महानंद अस्नोडकर दीपा तळकर, मधु परब, नयनी शेटगावकर, दत्ताराम ठाकूर आदींची भाषणे झाली.