प्रतिनिधी/कोल्हापूर
गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची जिल्हय़ाच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेनंतर कोल्हापुरात एकच जल्लोष करण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय, महापालिका, काँग्रेस, कमिटी, डी. वाय. पाटील साखर कारखाना आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटप करण्यात आले. या आनंदोस्तवात शशीकांत खोत, डॉ. महादेव नरके, डी. डी. पाटील, एस. एच. पाटील, सागर राणे, श्रीकांत चव्हाण, धैर्यशील जाधव, विजय शिंदे, महादेव मोरे आदी. सहभागी झाले होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष वेधले होते. अधून मधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही दावा करु लागल्याने काँग्रेस वर्तूळात चलबिचल होती. दोन दिवसापूर्वी मंत्री विश्वजीत कदम यांनी नियुक्ती झाल्याच्या वृत्ताने मंत्री पाटील समर्थकांमध्ये निराशा होती. बुधवारी मंत्री सतेज पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.