स्पेनमध्ये महागाई दरासोबत बेरोजगारी दरही वेगाने वाढतोय. याचबरोबर नोकरी करण्यासोबत स्वतःच्या आईवडिलांसमवेत राहणाऱया तरुण-तरुणींची संख्याही अत्यंत अधिक आहे. घराचे महाग भाडे भरता येत नसल्याने तरुण-तरुणी आईवडिलांसोबत राहत आहेत. यावरून स्पेनचे सरकार चिंतेत पडले आहे, कारण या स्थितीमुळे तरुण-तरुणी स्वतःचा संसार थाटण्याविषयी विचार करत नसल्याचे मानले जात आहे.
नव्या वर्षात 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 24,318 युरोंपेक्षा (20.5 लाख रुपये) कमी आहे, असे लोक पुढील दोन वर्षांपर्यंत कुठल्याही अपार्टमेंटचे भाडे देण्यासाठी सरकारकडून दर महिन्याला 20 हजारांचे अनुदान घेऊ शकतात अशी माहिती स्पनेचे गृहबांधणी मंत्री राकेल सांचेज यांनी दिली आहे.
पोलंडमध्ये स्थिती बरी
यूरोस्टेट डाटानुसार तरुण-तरुणींचे आईवडिलांचे घर सोडून स्वतःचे घर वसविण्याचे सरासरी वय पोलंडमध्ये सर्वात कमी 28 वर्षे आहे. क्रोएशियात सर्वाधिक 32 वर्षे आहे. तर स्पेन 30 वर्षे वयासह या यादीत मधल्या स्थानावर आहे. सरकारने अनुदान दिल्याने तरुण-तरुणींकडून अपार्टमेंट न घेण्याच्या समस्येवर कुठलाच प्रभाव पडणार नसल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
बहुतांशजण आईवडिलांसोबत
2020 च्या आकडेवारीनुसार 25-29 वयोगटातील 55 टक्क्यांहून अधिक तरुण-तरुणी आईवडिलांसोबत एकाच घरात राहतात. 2013 च्या आकडेवारीशी तुलना केल्यास अशा तरुण-तरुणींची संख्या 6.5 टक्क्यांनी वाढली आहे. सपेनमधील वाढत्या बेरोजगारीशी याचा थेट संबंध आहे. स्पेनमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे 29 टक्के युवा बेरोजगारआहेत. याचमुळे सरकार कमी उत्पन्न गटासाठी कोविड रिकव्हरी फंडमधून घरनिर्मितीकरता 1 अब्ज युरो (8840 कोटी रुपये) खर्च करणार आहे.