दक्षिण आफ्रिकेची सर्वबाद 229 धावांपर्यंत मजल, दुसऱया डावात भारत 2 बाद 85 धावा, भारताकडे 58 धावांची आघाडी
जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था
‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकुरने 61 धावांमध्येच 7 फलंदाज गारद केल्यानंतर भारताने येथील दुसऱया कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 79.4 षटकात सर्वबाद 229 धावांवर गुंडाळला आणि मंगळवारी या सामन्याच्या दुसऱया दिवसअखेर 2 बाद 85 धावांची मजल मारत 58 धावांची आघाडी प्राप्त केली. दिवसअखेरीस चेतेश्वर पुजारा 42 चेंडूत 35 तर अजिंक्य रहाणे 22 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिले.
दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी 1 बाद 35 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर कीगन पीटरसन (118 चेंडूत 9 चौकारांसह 62) व तेम्बा बवूमा (60 चेंडूत 51) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दुल ठाकुरने 17.5 षटकात 61 धावातच 7 फलंदाज गारद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 79.4 षटकात 229 धावांवर गुंडाळला गेला. शार्दुलला मोहम्मद शमी (21 षटकात 2-52) व बुमराह (21 षटकात 1-49) यांनी समयोचित साथ दिली. यजमान संघाने पहिल्या डावाअखेर 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली.
शार्दुल ठाकुरने कर्णधार डीन एल्गार (28), कीगन पीटरसन (62), डय़ुसेन (1), बवूमा (51), व्हेरेन (21), जान्सन (21), एन्गिडी (0) असे 7 फलंदाज गारद करत आफ्रिकन संघाला सातत्याने धक्के देण्याचा सिलसिला अखेरपर्यंत कायम राखला. एन्गिडीला शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद केल्यानंतर द. आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला आणि शार्दुलसाठी हा डावातील सातवा बळी ठरला.
त्यानंतर भारताने आपल्या दुसऱया डावात 20 षटकात 2 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार केएल राहुल (21 चेंडूत 8) स्वस्तात बाद झाला तर मयांक अगरवाल (37 चेंडूत 23) चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात पायचीत होणे निराशाजनक ठरले. दिवसअखेर चेतेश्वर पुजारा व रहाणे ही जोडी नाबाद राहिली.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 202.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. पंत, गो. शार्दुल 28 (120 चेंडूत 4 चौकार), एडन मॅरक्रम पायचीत गो. शमी 7 (12 चेंडूत 1 चौकार), किगन पीटरसन झे. अगरवाल, गो. शार्दुल 62 (118 चेंडूत 9 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन झे. पंत, गो. शार्दुल 1 (17 चेंडू), तेम्बा बवूमा झे. पंत, गो. शार्दुल 51 (60 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), काईल व्हेरेन पायचीत गो. शार्दुल 21 (72 चेंडूत 2 चौकार), मार्को जान्सन झे. अश्विन, गो. शार्दुल 21 (34 चेंडूत 3 चौकार), कॅगिसो रबाडा झे. सिराज, गो. शमी 0 (6 चेंडू), केशव महाराज त्रि. गो. बुमराह 21 (29 चेंडूत 3 चौकार), डय़ुआन ऑलिव्हिएर नाबाद 1 (12 चेंडू), लुंगी एन्गिडी झे. पंत, गो. शार्दुल 0 (1 चेंडू). अवांतर 16. एकूण 79.4 षटकात सर्वबाद 229.
गडी बाद होण्याचा क्रम
1-14 (मॅरक्रम, 3.5), 2-88 (एल्गार, 38.5), 3-101 (पीटरसन, 42.6), 4-102 (डय़ुसेन, 44.2), 5-162 (व्हेरेन, 64.6), 6-177 (बवूमा, 66.3), 7-179 (रबाडा, 67.3), 8-217 (केशव, 75.2), 9-228 (जान्सन, 79.1), 10-229 (एन्गिडी, 79.4).
गोलंदाजी
बुमराह 21-5-49-1, शमी 21-5-52-2, सिराज 9.5-2-24-0, शार्दुल 17.5-3-61-7, रविचंद्रन अश्विन 10-1-35-0.
भारत दुसरा डाव ः केएल राहुल झे. मॅरक्रम, गो. जान्सन 8 (21 चेंडूत 1 चौकार), मयांक अगरवाल पायचीत गो. ऑलिव्हिएर 23 (37 चेंडूत 5 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 35 (42 चेंडूत 7 चौकार), अजिंक्य रहाणे खेळत आहे 11 (22 चेंडूत 1 चौकार). अवांतर 8. एकूण 20 षटकात 2 बाद 85.
गडी बाद होण्याचा क्रम
1-24 (केएल राहुल, 6.5), 2-44 (मयांक, 11.4).
गोलंदाजी
रबाडा 6-1-26-0, ऑलिव्हिएर 4-0-22-1, एन्गिडी 3-1-5-0, जान्सन 6-2-18-1, केशव महाराज 1-0-8-0.
शार्दुलची गरुडझेप आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा…
आयपीएल प्रँचायझीने खेळवले नसल्याचे नैराश्य झेलण्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये डावात 7 बळी घेण्याचा पराक्रम गाजवण्यापर्यंत गरुडझेप घेणाऱया शार्दुल ठाकुरला घडवण्यात त्याचे गुरु दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अष्टपैलू शार्दुलला घडवताना त्याच्या मनोधैर्याची बाब वगळता अन्य कशावरही आपल्याला फारशी मेहनत घ्यावी लागली नाही, असे दिनेश लाड याप्रसंगी म्हणाले.
शार्दुल ठाकुरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम वरचष्मा गाजवला. याच जोरावर त्याला लॉर्ड शार्दुल व पालघर एक्स्प्रेस असे ओळखले गेले. पार्टनरशिप ब्रेकर ही खास ओळख त्याने यावेळी प्रस्थापित केली. शार्दुलने डावात 7 बळी घेतल्यानंतर वृत्तसंस्थेने दिनेश लाड यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी ते अर्थातच उल्हसित होते.
‘शार्दुलला किंग्स इलेव्हन पंजाबने करारबद्ध केले. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत खेळवले नाही, त्यावेळी तो अर्थातच नाराज झाला होता. पण, मी त्याला संयमावर भर देण्यास सांगितले. पंजाबने तुला निवडले आणि बडय़ा खेळाडूंसह सरावाची संधी मिळाली, हे महत्त्वाचे असल्याचे मी त्याला म्हणालो’, असे लाड यावेळी म्हणाले. विंडीजविरुद्ध निवडले गेल्यानंतर मी शार्दुलला रणजी क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी केली, त्याशिवाय वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले होते, याचाही लाड यांनी उल्लेख केला.
30 वर्षीय शार्दुल ठाकुरने ऑक्टोबर 2018 मध्ये विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. मात्र, त्यानंतर पुढील संधी मिळण्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागली. शार्दुलने जलद गोलंदाजीबरोबरच फलंदाजीवर देखील त्यानंतर मेहनत घेतली आणि गब्बाविरुद्ध गतवर्षातील कसोटीत त्याने याचे प्रत्यंतर आणून दिले होते.
सत्रनिहाय खेळ
सत्र / षटके / धावा / बळी / सरासरी
पहिले / 26.4 / 67 / 3 / 2.51
दुसरे / 25.2 / 89 / 3 / 3.51
तिसरे / 29.4 / 123 / 5 / 4.15
शार्दुलची अशीही डरकाळी आणि प्रतिस्पर्धी गोटात खळबळ!
शार्दुल शब्दाचा संस्कृतमध्ये वाघ असा अर्थ होतो आणि याच आधारावर शार्दुलचे सहकारी त्याला लॉर्ड बीफी असेही संबोधत असतात. योगायोग म्हणजे महान अष्टपैलू इयान बोथमला देखील लॉर्ड बीफी याच टोपण नावाने ओळखले जाते.
शार्दुलच्या पराक्रमात डय़ुसेनचा बळी वादग्रस्त
शार्दुलकडे बुमराहसारखे भेदक यॉर्कर नाहीत, त्याचप्रमाणे शमीसारखे स्कील सेटही नाही. पण, यानंतरही प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवे देण्यात तो कमालीचा यशस्वी ठरला. त्याने घेतलेल्या 7 बळींच्या पराक्रमात डय़ुसेनला बाद दिले जाणे मात्र वादग्रस्त ठरले. शार्दुलच्या ऑफकटरवर पंतने टिपलेला झेल वादग्रस्त होता. आफ्रिकन कर्णधार एल्गार यासाठी अगदी मॅच रेफ्रींच्या रुममध्येही पोहोचला. 2011 मध्ये अशाच पद्धतीने इयान बेलला बाद दिले गेले, त्यावेळी तत्कालीन कर्णधार धोनीने बेलला परत खेळ सुरु करण्याची सूचना करत खिलाडूवृत्ती दाखवून दिली होती.