सानुग्रह अनुदान 17 हजार रुपये खात्यावर वर्ग1 हजार रुपये कोरोनाचा भत्ता
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होवून सातारा पालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांना सानुगृह अनुदान मिळावे यासाठी पालिकेच्या कामगार संघटना पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या लढय़ाला यश आले असून दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यावर सातारा पालिकेने 17 हजार रुपये सानुगृह अनुदान वर्ग करण्यात आले आहे. तसेच एक हजार रुपये कोरोनाचा भत्ता देण्यात आला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या कर्मचाऱयांमध्ये दिवाळीचे फटाके फुटले.
सातारा शहरात मुलभूत सुविधा देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यरत असतात. स्वच्छता, लाईट, पाणी आदी कामे करतात. कोरोनाच्या काळातही पालिकेच्या सर्वच कामगारांनी चांगले काम केले असून पालिकेच्या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे अशी मागणी पालिका कर्मचाऱयांनी केलेली होती. वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यास यश आले असून पालिका कर्मचाऱयांच्या खात्यावर पालिकेने सानुगृह अनुदान वर्ग केले आहे. हे अनुदान 17 हजार तर एक हजार रुपये कोव्हिड भत्ता आहे. पालिकेच्या 451 कर्मचाऱयांना हे अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्वच कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिवाळीपूर्वीच त्यांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली आहे. दरम्यान, सातारा पालिकेकडे सतत कर्मचाऱयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी करणारे व कामगरांच्या हितासाठी भांडणारे पालिका कामगार युनियनचे श्रीरंग घाडगे यांनी शेवटपर्यंत ही भूमिका मांडली होती. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी पालिकेकडे 20 हजार रुपये सानुगृह अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे आज त्यांच्या आठवणी पालिका कर्मचाऱयांमध्ये जाग्या झाल्याचे रिपब्लिकन एम्लाएज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश दुबळे यांनी सांगितले.
पालिकेने दिले सानुग्रह अनुदान
सातारा पालिकेच्यावतीने 451 कर्मचाऱयांना सानुगृह अनुदान जमा करण्यात आले आहे. हे अनुदान आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. त्याचबरोबर पालिकेच्या कर्मचाऱयांना 1 हजार कोव्हिड भत्ताही देण्यात आला आहे, असे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडुगले यांनी सांगितले.