मडगाव, मुरगांव, केपे, सांगे, म्हापसाचा समावेश : आजपासून आचारसंहिता लागू होणार
प्रतिनिधी / पणजी
शिल्लक राहिलेल्या 5 पालिकांची निवडणूक आज मंगळवार दि. 30 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार असून प्रत्यक्ष मतदान 22 एप्रिल रोजी घेतले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे एकंदरित वेळापत्रक आज घोषित होणार असून आचारसंहिताही आजपासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वॉर्ड आरक्षण व पुनर्रचना या प्रश्नावरुन हा विषय प्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेला होता. तेथे मडगाव, मुरगांव, सांगे, केपे, म्हापसा या पाच पालिकांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. त्या स्थगितीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे गोवा खंडपीठाचा निर्णय उचलून धरण्यात आला आणि राज्य सरकारच्या याचिका फेटाळण्यात आल्या. तसेच 30 एप्रिलपूर्वी 5 पालिकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
त्या आदेशाची पूर्ती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली असून 5 पालिकांचे निवडणूक वेळापत्रक व त्याची अधिसूचना आज मंगळवारी जारी केली जाणार आहे. त्या 5 पालिकांमधील इच्छूक उमेदवार तसेच मतदार निवडणूक तारखेकडे डोळे लावून बसले आहेत. पणजी मनपासह इतर 7 पालिकांची निवडणूक 20 मार्च रोजी झाली व 22 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. आता पुन्हा एकदा 5 पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार असून ती सुमारे 20 ते 22 दिवस चालणार आहे. पुर्वीच्या पालिकांमध्ये मतदारांनी भाजपला कौल दिला तर या पाच पालिका निवडणुकीत मतदारराजा कोणाला कौल देतो, ते गोव्यातील एकंदरित राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.