हद्दवाढीमुळे 48नगरसेवक वाढणार , महिलांची संख्या असणार निम्मी
प्रतिनिधी/ सातारा
नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य शासनाच्यावतीने जे जे निर्णय होत आहेत. त्यानुसार सातारा शहरात हालचाली सुरु झालेल्या आहेत. काल राजकीय ओबीसी आरक्षणाला मंजूरी मिळाली आहे. तत्पूर्वी प्रभाग निश्चिती आणि नगरसेवक सदस्य संख्या निश्चिती ठरवण्यात येणार आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने एक वॉर्ड हा पूर्वी दीड हजार लोकसंख्याचा होता आता तो साडेतीन हजार लोकसंख्येचा होणार आहे तर प्रभाग हा साडेतीन हजाराचा होता आता साडेसात हजार लोकसंख्येचा होणार आहे. नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाचे कोणते आरक्षण पडणार हे अजून ठरणार असले तरीही पन्नास टक्के महिला आरक्षण हे ठरलेले असणार आहे. एसटी प्रवर्गाचा टक्का वाढणार आहे.
सातारा शहरात गतवेळीच्या झालेल्या निवडणुका या द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाल्या तसाच प्रकार याही वेळी होणार आहे. फक्त लोकसंख्या हद्दवाढ झाल्याने वॉर्ड आणि प्रभागामध्ये लोकसंख्या बदल होणार आहे. कशी रचना असेल कोणता भाग कोणत्या दिशेने सरकेल हे आताच समजू शकत नाही. परंतु पूर्वीचा वॉर्ड हा सुमारे दीड हजार लोकसंख्येचा होता आता होणारा वॉर्ड हा तीन हजार लोकसंख्येचा होणार आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या ही 1 लाख 20 हजार एवढी होती. नगरसेवकांची संख्या 40 होती. प्रभाग संख्या 20 होती. आता मात्र हद्दवाढ झाल्याने हद्दीत नव्याने 60 हजार लोकसंख्या वाढलेली आहेत. त्यामुळे हद्दीत आलेल्या लोकसंख्येमुळे 1 लाख 80 हजार लोकसंख्या झालेली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आता वॉर्ड हा 3 ते साडेतीन हजाराचा व प्रभाग 7 हजाराचा होणार आहे.
सातारा शहरात अनेकांनी तयारी केलेली आहे. परंतु अजून आरक्षण काय पडते हे जाहीर झाले नाही. अजून वॉर्ड व प्रभाग निश्चिती झालेली नाही. सध्या फक्त 48 नगरसेवक असणार आहेत हे समजले आहे. त्यातही लोकसंख्येच्या निकषानुसार एसटी या प्रवर्गातील लोकसंख्या शहरात वाढल्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 प्रभागातील 48 नगरसेवकांपैकी निम्मे नगरसेवक हे महिला असणार आहेत. त्यातही कोणते आरक्षण पडेल हे आताच समजू शकत नाही. अनेकांनी तयारी केली आहे. त्यात जर एसटी, एससी, बीसीसी आणि सर्वात शेवटी ओपन असे आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील कोणी तयारी करत असेल आणि तेथे एसटी किंवा एससी आरक्षण पडले तर अवघड बनणार आहे. त्याच्या इच्छा धुळीला मिळणार आहे. त्याच्या प्रभागात लोकसंख्या कोणत्या प्रवर्गाची जास्त असेल त्यावर आरक्षण ठरेल हेही पुढे ठरणार आहे. त्यामुळे आता तरी सर्व काही अंधारीच आहे.
हद्दवाढीच्या भागात अनेकजणांचे गुडघ्याला बाशिंग
सातारा शहरात नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात अनेकजण नगरसेवक होण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. अगदी कोरोना काळात स्वाब तपासणी मोहिम, सध्या लसीकरण कॅम्प तर स्वतःच्या वाढदिवसाला मोठमोठे उपक्रम राबवण्यात आले. परंतु त्या इच्छूकांची खरी अग्निपरिक्षा ही जेव्हा आरक्षण नेमके काय जाहीर होईल त्यावर ठरणार आहे. ओपन पडले तर दुधात साखरच पण इतर आरक्षण पडले तर अवघड परिस्थिती बनणार आहे.
प्रभाग रचना बदलणार शहरातील प्रभाग हे लोकसंख्येनुसार ठरणार आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे आणि त्याची सुरुवात उत्तरेकडून होते की चक्राकार होते हे अजून निवडणूक आयोगाकडून काहीच निर्देश दिले गेले नाहीत. परंतु लोकसंख्या वाढीमुळे सध्याच्या असलेल्या प्रभागाच्या हद्दी बदलणार आहेत. मोठा प्रभाग येवू घातलेल्या निवडणूकीमध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.