आमदार शिवेंद्रराजेंचे सूचक विधान
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेची येवू घातलेली निवडणूक ही आम्ही नगरविकास आघाडीच्या माध्यमातून स्वबळावर लढवणार आहोत. नगरविकास आघाडी स्वतःच्या ताकदीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे सूचक वक्तव्य करत आमदार शिवेंद्रराजें भोसले यांनी केले. तसेच ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी बेशक लढवावी, असा खोचक टोलाही त्यांनी सर्वच विरोधकांना लगावला.
आमदार शिवेंद्रराजे हे रविवारी सकाळी सुरुची निवासस्थानी जनतेची गाऱहाणी यांनी ऐकून घेतली. त्यानंतर ते बाहेर पडले असताना त्यांना पत्रकारांनी गाठले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदार संघात मला उमेदवारी द्या म्हणून मी कोणाकडे गेलो नाही. हा माझा हक्काचा आहे. मी कोणाच्याही पायऱया झिजवल्या नाहीत. याउलट उदयनराजेंचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून झाला आहे. यात माझा कसलाही संबंध नाही.
नगरपालिका निवडणुकीविषयी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, नगरविकास आघाडी ही आपल्या ताकदीवर स्वबळावर पालिकेची निवडणूक लढवणार आहे. निवडणुकीला उभा राहायला सगळय़ांना मुभा आहे. सगळय़ांचा तो लोकशाहीने दिलेला आधिकार आहे. त्यामुळे कोणी लढवायची आणि कोणी नाही लढवायची हे आपण ठरवू शकत नाही. त्यामध्ये मग राष्ट्रवादी, सेना, भाजपा असो की रिपाइं आपण कोणाला बंधने घालू शकत नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी लढवावी, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आमची नगरविकास आघाडी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी पुन्हा सांगितले.