प्रतिनिधी / पणजी
पालिका प्रभाग आरक्षण, पुनर्रचना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवलेला निवाडा आज सोमवार दि. 1 मार्च रोजी देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष त्या निवाडय़ाकडे लागून राहिले आहे.
गोवा खंडपीठात एकूण 10 याचिका सादर झालेल्या असून याचिकादारांनी पालिका वॉर्ड आरक्षण – पुनर्रचना यास आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील आरक्षण – पुनर्रचना कायद्यानुसार झाले नसल्याचे खंडपीठासमोर मान्य केल्यामुळे आता पालिका निवडणुकीचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील बुधवारी या प्रकरणी गोवा खंडपीठात सुनावणी झाली होती. त्यावेळी निवाडा राखून ठेवला होता. तो आता सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पणजी महापालिकेतील प्रभाग आरक्षण व पुनर्रचना संदर्भात आणखी एक याचिका गोवा खंडपीठात सादर झाली असून त्यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. एका बाजूने ही प्रकरणे न्यायालयात असताना दुसऱया बाजूने निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अर्ज सादर झाले नाहीत.