कोरोना कक्ष प्रमुखास कथित पुढाऱयाची शिवीगाळ,
प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी पालिकेच्या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन ठेवून भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी बापट यांना त्रयस्थ व्यक्तीजवळ फोनवरुन शिवीगाळ केल्याचा निषेध केला होता. त्याच दिवशी पालिकेत माची पेठेवरील एका तथाकथीत पुढाऱयाने कोरोना कक्षात घुसून कक्षाचे अधिकारी प्रणव पवार यांनाच शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणाचा निषेध पालिका कर्मचाऱयांनी बुधवारी नोंदवला. त्यामुळे पालिकेचे सर्वच कामकाज ठप्प झाले होते.
सातारा पालिकेत सोमवारी काम बंद आंदोलन होते. या आंदोलनामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोना कक्ष सुरु होता. त्याच दरम्यान माची पेठेतील दीपक गाडे नामक कथीत पुढारी हे पालिकेत गेले. त्या व्यक्तीकडून थेट कोरोना कक्षात काम करत असलेल्या अधिकारी प्रणव पवार यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाचा निषेध बुधवारी सकाळी पालिका कर्मचाऱयांनी पालिकेसमोर निदर्शने करुन केला. या आंदोलनात लाल बावटा युनियनचे श्रीरंग घाडगे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व कर्मचाऱयांनीं संबंधित प्रकाराचा निषेध नोंदवला.