डिचोली/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांमध्ये सांखळी नगरपालिकेच्या चालू असलेल्या राजकारणात विरोधी धर्मेश सगलानी आणि त्यांच्या गटातर्फे सर्वच प्रकरणात मुख्यमंत्र्यांचेच नाव घेऊन त्यांची बदनामी करण्याची मोहीम चालवली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. पालिकेच्या या कारभारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा काडीचाही हात नसून सर्व प्रक्रिया सरकारी प्रक्रियेनुसारच झालेली आहे. नगराध्यक्ष या नात्याने आपल्यासमोर आलेल्या याच नगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या बेकायदेशीर गोष्टी आणि घोटाळे वर काढून ते संबंधित अधिकारणीकडे पाठविल्यानेच हे नगरसेवक वैफल्यग्रस्त झाले असून त्यांनी प्रत्येक कामात मुख्यमंत्र्यांना ओढण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी सांखळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक आनंद काणेकर, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर, रश्मी देसाई व दयानंद बोर्येकर यांची उपस्थिती होती.
गेल्या 2017 साली सांखळीतील एक नागरिक लवू पेठकर यांनी विर्डी येथे एका नगरसेवकाने बेकायदेशीररित्या उभारलेल्या इमारतीविरोधात तक्रार नोंदवली होती. सदर तक्ररीवर खटला चालून 2019 साली सदर बेकायदा इमारत जमिनदोस्त करण्याचा आदेश निघाला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसल्यानंतर पालिका संचालनालयाकडे सदर प्रकरण नेले. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा काहीच सहभाग नाही. धर्मेश सगलानी हे 2018 ते 2020 पर्यंत नगरसेवक होते. त्यांच्याच कार्यकाळात हे प्रकरण पालिकेत आले होते. मात्र त्यांनी आपल्या खुर्चीच्या बचावासाठी कोणतीच या प्रकरणी कारवाई केली नाही, अशी टिका यशवंत माडकर यांनी केली.
नगरसेवक राया पार्सेकर यांचा नावावर तर मोठा घोटाळा
पूर्वीच्या काळात सांखळीत येणाऱया पारंपरिक पुरामुळे संकटात सापडलेल्या काही घरांना गोवा मुक्तीपूर्वी पोर्तुगीज सरकारने गोकुळवाडी येथे 70 चौ. मी. जागेत घरे उभारून दिली होती. सदर जागेची सरकारने भेटकरार केला होता. त्याच जागेवर राया पार्सेकर यांनी आपल्या घराला स्लॅब घातला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे आवश्यक परवाने न घेता तीन दुकाने उभारली आहेत. सदर दुकानांचे वर्गीकरणही करून घेतले आहे आणि धर्मेश सगलानी यांनी नगराध्यक्ष असताना सदर वर्गीकरण आणि नावावर करण्याची प्रक्रीयाही करून दिली आहे. या सर्व प्रक्रीयेसाठी राया विनायक पार्सेकर यांनी स्वतःच्या नावावर अर्ज केला होता. तर त्यासाठी नगरपालिकेतून कोणत्याही प्रकारचा आवश्यक परवाना घेतला गेलेला नाही. हे आज उघड झाले आहे. हे प्रकरण मुख्याधिकारी आणि पालिका संचालनालयाच्या नजरेस आणून दिल्यास आपले काय चुकले? असा सवाल यशवंत माडकर यांनी केला.
त्याहीपेक्षा मोठा घोटाळ राया पार्सेकर यांनी आपल्या नावे मिळकत दाखला घेताना केला आहे. सेसा कंपनीत चांगल्या पगारावर कामाला असताना त्यांनी आपल्या नावे केवळ 1 लाख 20 हजार ही आपली वार्षिक मिळकत असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन बनावट माहितीच्या आधारे मिळकत दाखला घेतला आहे आणि 2018 साली नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर नगरसेवकपदाचा गैरवापर करीत त्यांनी राज्य ओबीसी महामंडळाकडून घर दुरूस्तीसाठी कर्ज घेऊन बेकायदेशीरपणे सरकारने दिलेल्या जागेतील घराला स्लॅब घातला आहे. त्यासाठी कोणतेही आवश्यक सोपस्कार पूर्ण केलेले नाहीत. या बेकायदेशीर गोष्टी आपण मुख्याधिकारी आणि पालिका संचालनालयाच्या नजरेस आणून देत त्यावर कारवाईची मागणी केली. यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आलाच कुठून?, असे यावेळी यशवंत माडकर यांनी पुढे म्हटले.
बेकायदेशीर गोष्टींना अभय देण्यासाठीच सगलानी यांना खुर्ची पाहिजे – शुभदा सावईकर.
साखळी गृहनिर्माण वसाहतीतील आपल्या घराच्या विस्तारीत कामांसाठी साखळी नगरपालिकेतून सर्व आवश्यक परवाने घेऊन काम सुरू केले होते. मात्र अचानक एका च्यारी नामक इसमाने या कामाविरोधात तक्रार सादर केल्याने आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि आपण ते काम बंद केले. या कामाचे आपल्याकडे सर्व कायदेशीर सोपस्कार आहेत. आणि त्याचा सध्या नगरपालिकेत खटला सुरू आहे. धर्मेश सगलानी हे दोन वर्षे नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर का लक्ष घातले नाही? जर सदर काम बेकायदेशीर होते तर त्यांनी त्यावेळीच यावर आवाज उठविणे आवश्यक होते. मात्र तसे न करता ते आज या प्रकरणावर बोलत आहेत. म्हणजेच जर आपले प्रकरण बेकायदेशीर आहे तर त्यांनी त्यास साथ दिली होती, असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच त्यां?ना आपल्या गटातील नगरसेवकांच्या बेकायदेशीर गोष्टींना अभय देण्यासाठीच खुर्ची हवी आहे. अशी टिका नगरसेविका शुभदा सावईकर यांनी केली.