ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मनपा शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षण उपयोगी काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी युवक पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी आज शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा मीनाक्षी राऊत आणि उप प्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी यांना दिले.
मनपा प्रशासनस्तरावर अद्याप यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणच घ्यायचे नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरीब विद्यार्थ्यांकडे मात्र, स्मार्टफोनची कमतरता आहे. साधारण 50 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तसेच मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी पैशांची चणचण आणि नेटवर्कमध्ये अडथळे अशा कित्येक समस्यांचा सामना करावा लागतोय. यातून वर्षभरात कामगार, कष्टकरी वर्गातल्या पालकांच्या मुलांचा शाळेशी संपर्क राहिला नाही, तर त्यांच शिक्षण थांबेल अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. तरी अशा विध्यार्थ्यांना काही सुविधा पालिकेने उपलब्ध केल्यास पालिकेच्या विध्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी निवेदनातून केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे सौरभ ससाणे, रवी गाडे, संदेश कोतकर, अमोल गायकवाड उपस्थित होते.