प्रतिनिधी / सातारा :
खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचविण्यासाठी सातारा पालिकेने नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनला सातारकर नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. दररोज मदतीसाठी या हेल्पलाईनवर एक-दोन फोन येत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
सातारा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. दरड कोसळणे, रस्ता खचणे, धाकादायक इमारत कोसळणे इ. स्वरूपाच्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी आपत्ती घडल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी. म्हणून खा. उदयनराजे भोसले यांनी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा नंबर 02162-282636, अग्नीशामक चा 101 हा आहे. ही हेल्पलाईन सूरू झाल्यानंतर याला सातारकर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गोडोली येथे पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. सदर बझार, जुना आरटीओ चौक येथे झाडे पडली होती. यावेळी नागरिकांनी या हेल्पलाईनवर संपर्क केला. आणि त्यांना मदत पोहचविण्यात आली. दररोज मदतीसाठी एक-दोन फोन येत आहे. त्यानुसार मदत पोहचविली जात आहे. ही हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.