धामोड / वार्ताहर :
राधानगरी तालुक्यातील चांदेपैकी पाल बु॥ , पाल खुर्द येथील नियोजित लघु पाटबंधारे प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्याकरीता प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये दिले असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, पाल बुद्रुक/पाल खुर्द येथील नागरीकांची लघुपाटबंधारे तलावाची मागणी गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून प्रकल्पाला मान्यता घ्यावयाची असल्यास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. याकरीता आज जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचेकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये नियोजित लघु पाटबंधारे प्रकल्पास पाणी उपलब्धता करून देण्याचा प्रस्ताव जलसंधारण विभागाने शासनाकडे पाठवून देण्याचे निर्देश मंत्री कडू यांनी दिले. सदरील प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील पाठपुरावा करणे सोपे होईल. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्यातील आवश्यक असणाऱ्या पहिल्या टप्यास आज खऱ्या अर्थाने सुरवात झाली असून प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील पाठपुरावा करणे सोपे होईल असे आमदार आबिटकर म्हणाले.
यावेळी बैठकीस सहसचिव तथा मुख्य अभियंता स.अ.टाटू, उपसचिव श्रीमती पोतदार, कोल्हापूर पाटबंधारेचे अधिक्षक अभियंता श्री.सुर्वे, कार्यकारी अभियंता धनाजी पाटील, स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, राहूरी कृषि विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.