मेलबर्न : फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठलेली रशियाची ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हा ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळली असल्याचे तिनेच सांगितले.
पुढील आठवडय़ापासून ऍडलेडमधील स्पर्धेने डब्ल्यूटीए नवीन मोसमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेआधी दोन 250 गुणांच्या स्पर्धाही होणार आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धा 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ‘मंगळवारी मी येथे दाखल झाल्यानंतर घेतलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहे. माझे पूर्ण लसीकरण झाले असून दुबईतील स्पर्धेने नव्या मोसमाची तयारी करीत होते. सध्या मी आयसोलेशनमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व बंधने पाळत आहे,’ असे ती म्हणाली. यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविले तर रशियाला बिली जीन किंग चषक मिळवून देण्यात मोलाचा वाटाही तिने उचलला होता.