कराड प्रतिनिधी
शहरात काल दोन तासात 53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शहरी भागात दाणादाण उडवली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गोटे गावच्या हद्दीत असणाऱया निवासस्थानात पाणी शिरले होते. हे पाणी नैसर्गिक ओढे बुजवल्याने व त्यावरील अतिक्रमणांमुळे खासदारांच्या निवासस्थानात शिरल्याचे स्पष्ट होत असून याबाबत तातडीने ओढय़ांचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले.
शहरासह तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तुफानी पाऊस झाला. या पावसाने नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील दुकानगाळय़ांमध्ये पाणी शिरले होते. अनेक चौकांमध्ये, कॉलन्यांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. मलकापुरात नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, गोटे येथे नैसर्गिक ओढ बुजवल्याने व ओढय़ावर केलेल्या अतिक्रमणामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पाणी शिरले. हा प्रकार समजल्यानंतर प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. ओढय़ाचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने आणि ओढा आढवल्याने हा प्रकार झाला असल्याचे समोर आले.
अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता मात्र खासदार साहेबाच्या निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले नाही. अतिक्रमणांची आम्ही पाहणी केली असून तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकांने परवानगी घेतली असेल असे वाटते. मात्र तरीही त्याची सर्व माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास ते काढून घेतले जाईल, अशी माहिती तहसीलदार वाकडे यांनी दिली.
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पदाधिकाऱयांचे अतिक्रमण
खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह या परिसरातील शेतकऱयांनाही या बिल्डरच्या ओढय़ावरील अतिक्रमणाचा फटका बसला असून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पाणी शिरण्यास अतिक्रमण जबाबदार असून ते एका कॉंग्रेसच्या पदाधिकाऱयाने केले आहे, असा आरोप स्थानिक शेतकरी नागरिकांनी केला आहे. बिल्डरच्या अतिक्रमणाचा फटका खासदारांनाच बसला असून संबंधित बिल्डरवर कारवाई होणार का, असा सवालही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.