प्रतिनिधी/ बेळगाव
आठवडी बाजार पावसाच्या सरीतदेखील बहरल्याचे चित्र शनिवारी अनुभवायला मिळाले. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीबरोबरच भाजीपाल्याचा बाजार तेजीत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या संकटात महागाईची किनार यामुळे आठवडी बाजाराची उलाढाल पूर्वीच्या तुलनेत मंदावली आहे. यामुळे विक्रेते ग्राहकांच्या सेवेत हजर असले तरी ग्राहकांकडून खरेदीला म्हाणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे मत व्यक्त होत आहे. आठवडी बाजार सुरळीत झाला असला तरी गरजेच्या वस्तू खरेदीलाच प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले.
कोविड 19 च्या संकटछायेत लॉकडाऊनमुळे अनेक आठवडी बाजार सुनेसुनेच गेले. मात्र मागील चार आठवडय़ांचा शनिवारचा बाजार बहरत चालला आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी बाजाराचा दिवस साधण्यासाठी ग्राहकांकडून भाजीपाला खरेदी तसेच किराणा मालाचे साहित्य खरेदी केले जात आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत दर कमी अधिक असले तरी परिस्थितीनुसार आपल्या गरजा ओळखून खरेदी होत आहे. यामुळे दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी दिसून आली. मात्र, तोंडाला मास्क असला तरी खरेदी करताना सामाजिक अंतराचे भान नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पालेभाज्या दाखल.. टोमॅटोचा दर वाढला
बाजारात पालेभाज्यांचा बहर असून हिरव्यागार पालेभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असून मेथी मात्र 15 ते 20 रु. नग आहे. कांदा पात 20 रु. ला 4 नग, शेपू 15 रु. 2 नग, कोथिंबिर 10 रु. 1 किंवा 2 नग, लाल भाजी 10 रु. 2, पालक 10 रु. 2 याप्रमाणे विक्री केली जात आहे. पावसाच्या आगमनाने बाजारात पालेभाज्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत टोमॅटोने भाव खाल्ला असून सध्या 30 ते 40 रु. किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. शिवाय बिन्स, दोडकी नुकतीच दाखल झाली असल्याने 50 ते 60 रु. किलो, गवार 35 ते 40 रु. किलो, फ्लॉवर 20 रु. 1 नग तर कोबी 10 रु. ला 2 नग, वांग्याचा दर कमी झाला असून 10 रु. किलो दराने विक्री केली जात आहे.
कांदा दर झाला कमी
कांद्याचे दर कमी झाले असून लहान आकारातील कांदा 10 रु. किलो तर मोठय़ा आकाराचा कांदा 15 रु. किलो दराने विकला जात आहे. स्थानिक कांद्या बरोबरच नाशिकचा कांदा दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत सध्या बटाटे 10 ते 20 रु. किलो आहेत. ओली मिरची 30 ते 40 रु. किलो असून मागील आठवडय़ात 40 रु. किलो असणारी भेंडी 20 रु. किलो दराने विकली जात आहे. गाजर 30 रु. किलो असून सर्व प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध असून आवक होईल त्याप्रमाणे दर कमी-अधिक होत असल्याचे मत विक्रेत्यांमधून व्यक्त करण्यात आले.
लिंबूची आवक अधिक
उन्हाळय़ात प्रामुख्याने लिंबूचे दर अधिक असतात. मात्र लॉकडाऊनमुळे उन्हाळा असाच गेला. सध्या लिंबूची आवक अधिक असून दर कमी झाले आहेत. 10 रु. ला 12 ते 15 नग याप्रमाणे लिंबूची विक्री होत आहे. शिवाय स्वीट कॉर्नची विक्री जोरात असून 50 रुपयांना 7 ते 8 नग याप्रमाणे विक्री केली जात आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असली तरी उघडीप होईल त्याप्रमाणे बाजारात गर्दी होत असल्याचे दिसून आले.