निर्बंधांचे पालन करून उत्सव साजरा करा : इजिदोर फर्नांडिस
प्रतिनिधी /काणकोण
मागचे तीन दिवस सतत पडणाऱया पावसाने 9 रोजी थोडी संत घेतल्यामुळे गणेश भक्तांनी समाधान व्यक्त करतानाच चतुर्थीच्या खरेदीसाठी चावडीवर एकच गर्दी केली. यंदा माटोळीचे साहित्य एकत्र मिळावे यासाठी पालिका इमारतीजवळ स्वयंसेवी संघटनांनी बाजार भरविला. हे साहित्य खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर गोवा बागायत दार भवन आणि किराणामालाच्या अन्य दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती.
पावसाने उसंत घेऊन ऊन आल्याने फटाके आणि आतषबाजीचे अन्य साहित्य, हार, फुले घेण्यासाठी देखील गणेशभक्तांनी गर्दी केली. त्यामुळे चावडीवर जत्रेचे स्वरूप आले होते. बहुतेक सर्व जण आपल्या वाहनाने बाजारात येत असल्यामुळे आणि चतुर्थीच्या सणासाठी गावाबाहेर कामानिमित्त असलेले लोक गावात आल्यामुळे वाहन पार्किंगच्या बाबतीत खूपच गैरसोय झाली. कदंब बसस्थानकासमोरच्या रस्त्यावर त्याचप्रमाणे गायतोंडे मैदानावर वाहनांची एकच रांग लागली होती. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते. पावसाने अशीच कृपा केली, तर चतुर्थीचा सण कसलाच अडथळा न येता सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास जो तो आता व्यक्त करायला लागला आहे. यंदा कोरोना महामारीमुळे काही अपवाद सोडल्यास बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्सव आणि घरगुती उत्सव देखील दीड दिवसाचाच असेल. तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून कोरोना महामारीला अडविण्यासाठी घातलेले निर्बंध पाळूनच हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काणकोणच्या नागरिकांना केले आहे आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.