खानापूर-रामनगर रस्त्याची दुरवस्था : भाजप नेत्यांकडून कंत्राटदाराची खरडपट्टी
वार्ताहर /खानापूर
खानापूर-लोंढा-रामनगर या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. मुसळधार पावसापूर्वी या रस्त्यात चिखल साचून रस्ता पूर्णतः ठप्प झाला होता. पण मोठय़ा पावसानंतर रस्त्यावरील चिखल गायब झाला. त्यामुळे थोडय़ाफार प्रमाणात या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. पण आता महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केलेल्या 4 लाख 92 हजार निधीतून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करत असताना रस्त्यावर केवळ मुरूम टाकून पुन्हा या रस्त्याची दुरवस्था करण्याचा प्रकार दिसून आला. त्यामुळे पावसाने वाहून गेलेला रस्ता बरा, पण चिखलाचा नको, अशी चर्चा होत आहे. शुक्रवारी जि. पं. माजी सदस्य बाबुराव देसाई यांनी रस्ते दुरुस्ती करणाऱया कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. रस्त्याचे काम योग्य झाले नसल्याने तात्काळ काम बंद करा, असे सूचित करून हुबळी विभागीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली.
खानापूर-रामनगर महामार्ग वनखात्याच्या व पर्यावरणपेमींच्या न्यायालयीन वादामुळे दोन वर्षापासून रखडला आहे. महिन्याभरापूर्वी या रस्त्याचा विकासकामाला हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी 4 कोटी 92 लाखाचा निधीही मंजूर झाला आहे. पण सदर निधी अंतर्गत रस्त्याच्या डागडुजीचे काम केवळ नाममात्र असल्याने रस्त्याचे पुन्हा एकदा काम रखडले आहे. जर कंत्राटदाराला काम करायला जमत असेल तर त्यांनी खानापूर व रामनगर दरम्यान ज्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होत आहे, तेथे रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. गेल्या आठवडय़ात पावसामुळे लोंढानजीक पूल कोसळल्याने अवजड वाहतूक बंद झाली. खानापूर ते लोंढापर्यंतचा रस्ता सुरू आहे. पण कंत्राटदाराने केवळ नाममात्र दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मोठा पाऊस झाल्यास पुन्हा या ठिकाणी दलदल निर्माण होईल. त्यामुळे खड्डे पडलेल्या ठिकाणी खडी टाकून भक्कम रस्ता करावा. अन्यथा काम बंद करावे, अशी मागणी बाबुराव देसाई यांनी केली.
आम्ही रस्ता करून दाखवू
जर मंजूर झालेल्या निधीतून योग्यरित्या काम करण्यास कंत्राटदाराला जमत नसेल तर लोंढा ते खानापूर दरम्यान अडचणीच्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने आमच्याकडे 10 टिप्पर आणि एक जेसीबी द्यावा. दोन दिवसात आम्ही रस्ता करून दाखवू, असा सज्जड इशारा संबंधित कंत्राटदाराला दिला.