प्रतिनिधी / महाड
महाडसह संपूर्ण परिसरात गेली दोन दिवस पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल झाला. त्यातच गारपिट झाल्याने वातावरणात बदल होऊन आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाडसह संपूर्ण परिसरात आणि पोलादपूर तालुक्यात सायंकाळी ढग जमून आले. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटात सात वाजण्याच्या सुमारास पाऊस पडू लागला. गारांसह पाऊस पडल्याने वातावरण बदलून गेले आहे. वातावरणात दिवसा प्रचंड उष्मा जाणवू लागला होता त्यातच पडत असलेल्या पावसाने बदलत्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सातत्याने दोन दिवस पडणाऱ्या पावसाने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. एकीकडे शेतकरी लॉकडाऊन काळात शेतीची कामे आटोपण्याच्या मार्गावर असताना आणि दुसरीकडे आंबा उत्पादक शेतकरी आंबा पीक बाजारात आणण्याच्या तयारीत असतानाच पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पावसामुळे तयार आंबा पीक हातातून निसटून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.