वार्ताहर/ कराड :
पावसाळा तोंडावर आल्याने कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नाले सफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहेत. आरोग्य विभागाचे जवळपास 30 कर्मचारी नालेसफाईचे काम करीत आहेत. कोल्हापूर नाका व स्टेशन रोड परिसरातील नाले सफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शहरात काम सुरू आहे. याबरोबरच अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तोडफोड झालेल्या गटारींची दुरूस्तीही करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानात देश पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या कराड शहरातील खुल्या नाल्यांची नियमित सफाई करण्यात येते. मात्र ड्रेनेजला जोडलेले मोठे व बंदिस्त नाल्यांच्या सफाई दरवर्षी पावसाळय़ापूर्वी करावी लागते. आरोग्य विभागाचे 30 कर्मचारी नाले सफाईचे काम करीत आहेत. आजअखेर कोल्हापूर नाका व स्टेशन रोड परिसरातील नाले सफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर सध्या कार्वे नाका व मंडई परिसरातील नाले सफाई करण्याचे काम सुरू आहे.
गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसात शहरातील काही भागात नाले भरून पाणी रस्त्यावरून वाहिल्याने आरोग्य विभागाने नाले सफाईवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. तर दत्त चौक, कौल्हापूर नाका, पोपटभाई चौक आदी परिसरातही रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली होती. त्यामुळे या भागातील नाले सफाईचे कामही करण्यात आले आहे.
लॉकडाऊनपूर्वी कराड शहरात राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मुख्य बाजारपेठेसह अन्य भागातील गटारींची तोडफोड झाली होती. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने गटर दुरूस्तीचे काम रखडले होते. मात्र पावसाळा तोंडावर आल्याने पालिकेने तोडफोड झालेल्या सर्व गटरच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. सध्या मुख्य बाजारपेठेतील गटारींची दुरूस्ती करण्यात येत आहे. याबरोबरच शहरातील अन्य ठिकाणच्या गटरची दुरूस्तीही करण्यात येत आहे.