सोशल डिस्टन्सिंग, हवेत विषाणू नष्ट करणाऱया यंत्राचा वापर होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठीच्या तयारीने वेग पकडला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी लोकसभा आणि राज्यसभेत सदस्यांच्या आसनव्यवस्थेसाठी दोन्ही सभागृहांचे चेंबर तसेच गॅलरींचा वापर केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या अंतिम आठवडय़ात किंवा सप्टेंबरच्या प्रारंभी सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिवेशनादरम्यान वरिष्ठ सभागृहाचे सदस्य दोन्ही चेंबर आणि गॅलरींमध्ये बसतील. 1952 नंतरच्या भारतीय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारची व्यवस्था केली जात आहे. यांतर्गत 60 सदस्य राज्यसभेचे चेंबर आणि 51 सदस्य गॅलरीत बसतील. उर्वरित 132 सदस्यांना लोकसभेच्या चेंबरमध्ये बसविण्यात येणार असल्याचे राज्यसभा सचिवालयकडून सांगण्यात आले.
पहिल्यांदाच लार्ज डिस्प्ले स्क्रीन, कंसोल्स, अल्ट्रावायोलेट, जर्मिसिडल इर्रेडिएशन सिस्टीम, दोन्ही सभागृहांदरम्यान विशेष केबल आणि पॉलिकॉर्बोनेट सेपरेटरचा वापर केला जात आहे.
सकाळ अन् संध्याकाळ
सर्वसाधारणपणे दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाचवेळी होते, परंतु यंदा विशेष परिस्थितीमुळे एक सभागृह सकाळी आणि दुसरे संध्याकाळी चालणार आहे. ऑगस्टच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत अधिवेशनाची तयारी पूर्ण केली जावी, त्यानंतर चाचणी, रंगीत तालीम आणि अंतिम आढावा घेतला जावा असा निर्देश राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. संसदेचे मागील अधिवेशन कोरोना संकटामुळे मध्येच रोखावे लागले होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज 23 मार्च रोजी स्थगित करण्यात आले होते. नियमानुसार मागील अधिवेशनाच्या 6 महिन्यांच्या आत संसदेचे अधिवेशन आयोजित करणे क्रमप्राप्त आहे.
पंतप्रधानांची आसनव्यवस्था
राज्यसभा सचिवालयानुसार विविध पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार राज्यसभेचे चेंबर आणि गॅलरीत आसने उपलब्ध केली जाणार आहे. उर्वरित लोकसभेच्या चेंबरमध्ये दोन ब्लॉकमध्ये (सत्तारुढ आणि अन्य) बसविण्यात येईल. राज्यसभेच्या चेंबरमध्ये पंतप्रधान, सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्षनेते आणि अन्य पक्षाच्या नेत्यांसाठी आसन निश्चित केले जाईल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच.डी. देवेगौडा यांचेही आसन निश्चित करण्यात येणार आहे.
विशेष व्यवस्था…
वातानुकुलन यंत्रणेत अल्ट्रावायोलेट जर्मिसिडल इर्रेडिएशन यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो. या यंत्रणेमुळे वातानुकुलन यंत्रणेतील जीवाणू आणि विषाणू नष्ट करता येणार आहेत. अधिकाऱयांसाठीचा आणि पत्रकारांच्या कक्षातही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. तेथे 15 जणांना बसविण्यात येणार आहे. मर्यादित संख्येत सचिवालयाच्या अधिकाऱयांना सभागृहाच्या टेबलवर बसविले जाणार आहे. पत्रकारांना विदेशी अतिथींसाठी निर्माण करण्यात आलेल्या विशेष कक्षात बसविण्यात येणर आहे.