आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट करण्याची धमकी
@ वृत्तसंस्था / मॉस्को, कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाला शनिवारी 17 दिवस पूर्ण झाले. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि नजीकच्या भागांमधील हल्ले तीव्र केले आहेत. पाश्चिमात्य देशांकडून रशियाविरोधात सातत्याने निर्बंधांची घोषणा केली जात आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल रशिया देखील कठोर पावले उचलत आहे. पाश्चिमात्य देशांकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट होऊ शकते अशी धमकी रशियाने दिली आहे.
अमेरिका आणि रशिया मागील 24 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या देखभालीसाठी एकत्र काम करत आहेत. दोन्ही देशांच्या ताळमेळीतून 21 व्या शतकातील अनेक महत्त्वपूर्ण संशोधने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर करण्यात आली आहेत, परंतु युक्रेन युद्धाने स्थितीच पालटविली आहे. रशियाच्या धमकीनंतर अमेरिकेचे अंतराळवीर मार्क वंदे हेई हे दोन अन्य रशियन अंतराळवीरांसोबत कजाकिस्तानात उतरण्याची योजना आखत आहेत.
दोन हिस्स्यांमध्ये विभागलेले
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला दोन हिस्स्यांमध्ये विभागण्यात आले आहे. एक हिस्सा रशियाकडून तर दुसरा हिस्सा अमेरिकेकडून संचालित होतो. 1998 मध्ये रशिया आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना एकत्रितपणे या अंतराळस्थानकात पाऊल ठेवले होते. तेव्हापासून दोघांमधील भागीदारी कायम आहे.
युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा करत युद्ध रोखण्याचे आवाहन केले आहे. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडा युक्रेनच्या लोकांसोबत उभा असल्याचे म्हणत जी-7 देश रशियाला आर्थिकदृष्टय़ा एकाकी पाडणार असल्याचे उद्गार काढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियन मद्य, सागरी खाद्य आणि हिऱयांच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. रशियाचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मागे घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.