प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र लॉकडाऊनपासून बंद आहे. त्यामुळे हे कार्यालय केव्हा खुले करणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. राज्यातील इतर पासपोर्ट केंद्र सुरू असताना बेळगावमधील पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र सुरू का? नाही. त्यामुळे ज्यांना गरज आहे, अशा व्यक्तींना हुबळीला जावून पासपोर्ट काढावे लागत आहेत. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
पोस्ट कार्यालयाच्या मदतीने शहरात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. मुख्य पोस्ट कार्यालयाच्या माडीवर ही कार्यालय सुरू झाले. प्रारंभी दररोज 50 पासपोर्ट काढण्यात येत होते. त्यांनतर ही संख्या 100 पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे बेळगावमधील नागरिकांना बेळगावमध्येच पासपोर्ट काढणे सोपे झाले होते. परंतु लॉकडाऊन सुरू होताच हे कार्यालय बंद करण्यात आले होते.
सोशल डिस्टसिंग राखता येणार नाही त्यामुळे हे कार्यालय अद्याप बंद आहे. राज्यातील इतर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू असतानाही बेळगावमधील सेवाकेंद्र बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. इतर सरकारी कार्यालये आता सुरू झाली आहेत. त्यामुळे पासपोर्ट सेवा केंद्रही सुरू करण्याची मागणी होत आहे. बेळगाव बरोबरच चिक्कोडी येथीलही सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.