प्रतिनिधी/ खेड
शहरातील कुंभारआळी येथील शांती हाईट्स निवासी संकुलातील तीन फ्लॅट संमतीविना परस्पर खरेदी करून 65 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात दुय्यम निबंधकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत संजय पांडुरंग पाटणे यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
शहरातील सतत गजबजलेल्या कुंभारआळी येथे शांती हाईट्स या निवासी संकुलात तक्रारदारांच्या नावाचे तीन फ्लॅट आहेत. मात्र या फ्लॅटचे कुलमुखत्यार पत्र असल्याचा फायदा घेऊन संशयितांनी परस्पर तीनही फ्लॅट खरेदी करून बेकायदा कब्जा केला. त्यामध्ये विनापरवाना फेरबदल करून इमारतीला धोका निर्माण करत आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तिघांची नावे मात्र समजू शकली नाहीत.