वृत्तसंस्था/ ओस्लो (नॉर्वे)
येथे सुरू असलेल्या पुरूष आणि महिलांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल पिंकी हिला उपांत्य लढतीत जर्मनीच्या हेमरकडून निसटता पराभव पत्करावा लागला. आता तिची लढत कांस्यपदकासाठी होणार आहे.
महिलांच्या 55 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत जर्मनीची मल्ल निना हेमरने पिंकीचा 8-6 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. पुरूषांच्या विभागात भारताच्या रोहितला कांस्यपदकाच्या लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत विश्व कुस्ती स्पर्धेत भारताच्या एकाही महिला मल्लाला अंतिम फेरीत मजल मारता आलेली नाही. 2012 साली गीता फोगट आणि बबिता फोगट तसेच 2018 साली पुजा धांडा आणि 2019 साली विनेश फोगट या भारतीय महिला मल्लांनी विश्व कुस्ती स्पर्धेत आतापर्यंत कांस्यपदके मिळविली आहेत. पिंकीची कांस्यपदकासाठी मंगळवारी लढत होणार आहे. पुरूषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या रविंद्रला कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या ओचिरने पराभूत केले. या स्पर्धेत यावेळी भारताच्या बजरंग पुनिया, रवी दाहिया आणि दीपक पुनिया यांनी आपला सहभाग दर्शविला नाही.