अर्जुन राणे / कुडाळ:
वय वर्ष अवघे अठरा. पण या खेळण्याöबागडण्याच्या वयात ती काय-काय करते हे पाहून चकित व्हायला होते. ती तरवा काढते, ती लावणी लावते अन् लावणी करतेही (अर्थात ती ‘डान्स क्वीन’ही आहे) ती स्पोर्टस् (वू) मन आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर वाहनेही ती लिलया चालविते. ती अभ्यासातही हुशार आहे. इतकेच नव्हे, तर ती पुरुषालाही लाजवेल, अशा उत्साहाने दिवसभरात सहा तास पॉवर टिलर चालवून शेतीही नांगरते.
ही कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-शेटकरवाडी येथील रहिवासी आहे. सायली अनिल राऊळ असे तिचे नाव. आई-वडिलांना शेतीकामात आवडीने व उत्स्फूर्तपणे मदत करते. कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमधून या वर्षी ती बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेतून 70 टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाली आहे. तिला पोलिसांत भरती व्हायचे आहे.
शेतीच्या सर्व कामांमध्ये माहीर
पिंगुळी-शेटकरवाडी येथील अनिल बाळकृष्ण राऊळ व सौ. अनिता राऊळ या दाम्पत्याची ही मुलगी. वडील अनिल उर्फ भाई राऊळ हे शेतकरी असले, तरी लक्झरी बसचालक आहेत. त्यांनाही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर वाहने चालवायची आवड. 2018 सालात त्यांनी शेतीसाठी टिलर घेतला. तेव्हापासून म्हणजे वयाच्या 16 व्या वर्षापासून सायली टिलर चालवायला शिकली. गेली दोन वर्षे ती पॉवर टिलर चालवून वडिलांना शेती कामात मदत करते. तिचा भाऊ साईराजही पॉवर टिलर चालवून वडिलांना मदत करतो. वडील आणि भाऊ भातशेतीची इतर कामे करीत असताना, सायली न कंटाळता, न थकता आनंदाने पॉवर टिलर चालविते. त्याचबरोबर ‘कुणग्या’त ‘मेरे काढणे,’ ‘भाताची पेंडका’ आणणे, भात मारणे, भात वाऱया देणे अशी शेतीची सर्वच कामे ती करून आईला मदत करते. मजुरांना द्यावे लागणारे पैसे ती वाचवते. सुकी जमीन असो, चिखलाची जमीन असो की शेळ जमीन, कोणत्याही क्षेत्रात ती पावर टिलर लिलया चालविते. लावणी नृत्यही तितक्याच तन्मयतेने ती करते. घरातच वडिलांकडून तिला वाहन चालविण्याचे बाळकडू मिळाले. पॉवर टिलर त्यांनीच तिला शिकविला. मोटारसायकल तर ती आठवीपासून चालविते.
क्रीडा क्षेत्रातही तरबेज
क्रीडा क्षेत्रातही ती तरबेज आहे. शालेय जीवनापासून ते कनिष्ठ महाविद्यालयीन कालावधीत ती 100 मीटर धावणे, 100 मीटर हर्डल्स या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह खोखो स्पर्धांतही तिने तालुका, जिल्हा, विभागीय ते राज्य पातळीवर कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रथम तीन क्रमांकाची बक्षिसे तिने अनेकदा पटकावली आहेत. खोखोमध्ये बारावीपर्यंत कुडाळ हायस्कूलची लीडरशीपही तिने केली आहे.
‘दम दमा दम’ विजेती सायली
नृत्याची तिला लहानपणापासूनच आवड. तालुका, जिल्हा, आंतरराज्य एकेरी नृत्य स्पर्धांमध्येही तिने विजेते पदे पटकावली आहेत. वाई, सातारा, डोंबिवली, रत्नागिरी, गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विविध स्पर्धा व स्टेज शो तिने केले आहेत. इयत्ता चौथीत असताना 2011 साली सहय़ाद्री मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘दम दमा दम’ या डान्स रिऍलिटी शोची संपूर्ण राज्यातून ती विजेती ठरली आहे. देवगड येथील अनुजा अनिल गांधी यांच्याकडे ती कथ्थक शिकते. कथ्थक विशारद प्रथम वर्षाचा अभ्यास ती सध्या करतेय. तिला पिंगुळी ग्रामपंचायतीचा कन्यारत्न पुरस्कार, कणकवलीचा पर्यटन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘उंबूटू,’ ‘कांकण’ या मराठी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. उंबूटू चित्रपटात छोटय़ा नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका तिने केली होती. अशा या सायलीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!