सीरियाच्या शरणार्थी शिबिरात 6 वर्षीय नहला होती उपाशी : खाण्याच्या गडबडीत श्वास कोंडल्याने झाला मृत्यू
नहला अल ओथमान, साखळदंडांमध्ये कैद दिसून येणाऱया या 6 वर्षीय मुलीचे नाव हेच आहे. ती कुपोषणाची शिकार होती. घाईघाईने खाण्यादरम्यान गळा चोक झाल्याने तिचा मृत्यू ओढवला आहे. अत्यंत छोटय़ा आयुष्यात नहलाने मोठा संघर्ष पाहिला आणि सहन केला आहे. युद्धामुळे मदत शिबिरांमध्ये ती स्वतःच्या वडिलांसोबत राहत होती. सीरियाच्या शरणार्थी शिबिरात वडिल तिला दिवसा बांधून ठेवायचे, जेणेकरून ती कुठे हरवू नये. रात्रीही तिला एक पिंजरावजा बिछाना मिळायचा.
आम्ही अनेकदा मुलीच्या वडिलांना तिला साखळदंडांपासून मुक्त करण्यास आणि पिंजऱयात न ठेवण्यास सांगितले, पण ते नेहमीच नकार द्यायचे असे शिबिराचे निरीक्षक हिशाम अली उमर यांनी म्हटले आहे. नहलाची साखळदंडांमधील छायाचित्रे समोर आल्यावर गदारोळ उडाला होता. उत्तर सीरियामध्ये शिबिरांमध्ये राहत असलेले लाखो लोक किती हलाखीत आहेत हे या छायाचित्राद्वारे जगाने पाहिले होते. तिच्या वडिलांना अटक करण्यात आली होती.
नहला स्वतःच्या कुटुंबासोबत बंडखोरांच्या ताब्यातील फरजल्लाह शिबिरात राहत होती. तेथे लोक बॉम्ब-गोळीबाराच्या छायेत राहतात. विशेषकरून मुलांसाठी या शिबिरांमधील स्थिती अत्यंत अवघड होत चालली आहे. कित्येक दिवस या शिबिरांमध्ये अन्न मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले आहे.