ऑनलाईन टीम / पिंपरी :
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घडली घटना आहे. या घटनेत कोणालाही जखम झालेली नसून सध्या ते सुखरूप आहेत. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या सुपरवायझरने हा गोळीबार केला आहे. प्राथमिक माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव तानाजी पवार असे आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यलयाच्या समोर घडल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. अटकेत असलेले तानाजी पवार हे सीआरपीएफचे निवृत्त जवान आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ठेकेदार अँथोनी यांचा सुपरवायझर तानाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून आम्ही संपर्क करत होतो. दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात मी संपर्क करत होतो. माझ्या पीएने तानाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. आम्ही त्याला समजावून सांगितले. मात्र, त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला. आमच्या काही वादावादी झाली नाही, मात्र पवारने वाद घातला, असे त्यांनी सांगितले आहे.