ऑनलाईन टीम / पिंपरी :
पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा लवकरच नालेसाफसफाईचे काम हाती घेतले होते. शहरातील नालेसफाई जवळपास 95 टक्के पूर्ण झाली आहे. काही मोठी कामे चालू आहेत. ती लवकरच पूर्ण केली जातील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच मागील वर्षी ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते. त्याठिकाणचे नाले देखील पूर्ववत करुन घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे-मोठे मिळून 152 नाले आहेत. त्यामध्ये ‘अ’ प्रभागात 25, ‘ब’ 13, ‘क’ 33, ‘ड’ 12, ‘ई’ 21, ‘फ’ 15, ‘ग’ 9 आणि ‘ह’ प्रभागात 24 नाले आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसाफई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापुर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसाफई केली जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाल्यांची साफसाफई मोहिम एप्रिलपासूनच सुरु केली होती. शहरातील नालेसफाई 95 टक्के पुर्ण झाली आहे.