सातारा तालुका पोलिसांची कामगिरी : रोख रक्कम व दुचाकी हस्तगत
प्रतिनिधी / सातारा
येथील वाढे फाटा येथे पिकअप वाहन चालकास मारहाण करून जबरदस्तीने लुटणाऱया तीन चोरटय़ांना ताब्यात घेण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी, गुह्यात वापरलेले शस्त्र व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अधिक अंकुश पवार (वय 27) सुयश अशोक जाधव (वय 19) दोघेही राहणार सैदापूर (ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यामध्ये तिसरा अल्पवयीन बालक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे (ता. सातारा) गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावर एक पिकअप वाहन थांबवून चालक लघुशंकेस उतरला होता. त्यावेळी तिथे दुचाकीवरून आलेल्या या तीन चोरटय़ांनी पिकअप वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून, त्यास मारहाण करून त्याच्याकडील 3 हजार रुपये घेऊन पळून गेले होते. त्याबाबत अविनाश किसन शेळके (रा. विरोबा वस्ती, लोणंद) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी चोरटय़ांना पकडण्याच्या सूचना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हांकरे यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱयांनी तपास सुरु केला होता.
याबाबत तपास करून माहिती प्राप्त करुन एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अधिक तपासामध्ये त्याने अन्य दोन साथीदारांसमवेत गुन्हा केल्याची कबुली केली. तद्नंतर त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीही गुह्याची कबुली केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, निलेश जाधव यांनी सहभाग घेतला.