डीआरडीओला मिळाले यश -पूर्वीच्या यंत्रणेपेक्षा खूपच अपग्रेड
वृत्तसंस्था / पोखरण
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) शनिवारी लाँचर सिस्टीम पिनाका-ईआरच्या एक्सटेंडेड व्हर्जनचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे परीक्षण राजस्थानच्या पोखरणमध्ये पार पडले आहे. डीआरडीओनुसार पिनाका-ईआर हे पिनाकाच्या जुन्या आवृत्तीचे अत्याधुनिक स्वरुप आहे. पिनाका मागील एक दशकापासून भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील आहे. प्रणालीला अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आवश्यकता लक्षात घेत डिझाईन करण्यात आले आहे.
पोखरण रेंजवर झालेल्या या मल्टी बॅरेल रॉकेट लाँचर सिस्टीमचे शनिवारी परीक्षण पार पडले आहे. डीआरडीओने या प्रणालीचे डिझाईन पुण्यातील आयुध संशोधन आणि विकास प्रतिष्ठान तसेच हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लेबोरेट्रीसोबत (एचईएमआरएल) मिळून डिझाईन तयार केले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय उद्योग क्षेत्राला हस्तांतरित करण्यात आले आहे.
या प्रणालीला मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. यापूर्वी ओडिशामध्ये जून महिन्यात पिनाकाच्या मल्टी बॅरेल रॉकेट सिस्टीमचे परीक्षण करण्यात आले होते. पिनाका रॉकेट सिस्टीम अंतर्गत 45 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा भेद करता येऊ शकतो. रॉकेटद्वारे लक्ष्यावर अत्यंत अचूकपणे निशाणा साधण्याची यात क्षमता आहे.
यापूर्वी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या एअर लाँच आवृत्तीचे बुधवारी ओडिशाच्या चांदीपूर येथे सुपरसोनिक लढाऊ विमान सुखोई 30 एमके-कायद्वारे यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. या प्रक्षेपणाद्वारे आकाशातून मारा करू शकणाऱया ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या या आवृत्तीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.