खानापूरच्या युवकाला अटक : सीईएन विभागाची कारवाई : अनेकांना दिले बनावट रिपोर्ट
प्रतिनिधी / बेळगाव
पिरनवाडी येथील एका बनावट लॅबवर छापा टाकण्यात आला आहे. एकीकडे कोरोना महामारीचा कहर वाढत असताना खानापूर येथील एका महाभागाने बनावट लॅब थाटून नागरिकांना बोगस तपासणी रिपोर्टही देण्यात येत होता. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुरुवारी या संबंधीची माहिती दिली आहे. या लॅबमध्ये कोविड प्रोपायलिंग रिपोर्टही दिला जात होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी हसनसाब अब्दुलखादर सय्यद (रा. निंगापूर गल्ली-खानापूर) या युवकाला अटक केली असून केवळ 15 दिवसांत या युवकाने अनेकांना बनावट रिपोर्ट दिले आहेत.
पिरनवाडी येथील एका घरात ही लॅब सुरू होती. कोरोनाचे निदान करण्यासाठी सुरूवातीला रक्ततपासणीही केली जात होती. पिरनवाडी येथे कोविड प्रोपायलिंग तपासणी संबंधी बोगस रिपोर्ट दिले जात असल्याची माहिती सीईएन विभागाला मिळाली. बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून पाहणी केली असता त्यांना धक्का बसला.
लॅपटाप, प्रिंटरसह इतर साहित्य जप्त
लॅपटॉप, प्रिंटर, सिरींज बॉक्स, रॅपिड टेस्ट कार्डस्, डेंग्यू रॅपिड टेस्ट कार्ड, मलेरिया रॅपिड टेस्ट कार्डस्, सीआरपी स्लाईड टेस्ट बॉक्स, मायक्रो टिप्स्, ज्या नावाने लॅब चालत होता त्या नावाची रेफरल पॅड, शिक्के, 24 हजार रुपये रोख रक्कम, एक इंडिका कार (क्रमांक एमएच 11 एडब्ल्यू 3886) आदी जप्त करण्यात आले आहे.
लॅब चालविण्यासाठी आवश्यक व रक्ततपासणीसाठी आवश्यक कसलीही मशनरी नसताना ही लॅब थाटण्यात आली होती. या लॅबमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात होत्या. पोलिसांनी यल्लुबाई, प्रशांत, हिरा सुतार, सुनील देवरमनी आदींच्या नावचे तपासणी अहवालही जप्त केले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हसनसाब हा लोटस डायग्नोस्टिक सेंटर लॅबोरेट्रीत काम करीत होता. 10 मे 2021 रोजी ही लॅब बंद झाल्यानंतर खेडय़ापाडय़ातील डॉक्टर व रुग्णांबरोबरच असलेल्या चांगल्या संबंधाचा वापर करुन हसनसाबने एका खोलीत स्वतःच लॅब थाटली व लोटस डायग्नोस्टिकच्या नावानेच तपासणी अहवाल देण्यास सुरू केली होती.
लोटसबरोबरच मेडसिटी क्लिनीकल लॅबोरेट्ररी या नावानेही तयार झालेले रिपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. बोगस लॅबमध्ये रिपोर्टसाठी काही डॉक्टर रुग्णांना पाठवत होते. खास करुन हसनसाब हा रुग्णांच्या घरोघरी जाऊन तपासणीसाठी रक्त घेत होता. त्यामुळे केवळ 15 दिवसांत त्याचे व्यवहार चांगले चालले होते.
चौकट करणे
200 जणांचे रिपोर्ट हसनसाबने केवळ 15 दिवसांमध्ये 200 जणांची रक्त तपासणी करुन त्यांना रिपोर्ट दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले असून पोलीस पथकाला बक्षीस जाहीर केले आहे.