क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पिरनवाडी येथे दीपावलीनिमित्त पुरूष व महिला प्रो कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुनील एन्टरप्रायझेस संघाने स्मार्ट ग्रुप संघाचा दोन गुणाने मात करून विजेतेपद तर महिला गटात बालिका आदर्शने पिरनवाडी महिला संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत एकूण 8 संघानी भाग घेतला. पी यंग स्पोट्स, कनका बॉईज, पिरनवाडी योद्धा, क्रांतीवीर स्पोर्ट्स, सुनील एन्टरप्रायझेस, गोल्ड नाइफ्स, स्मार्ट ग्रुप व सरला स्पोर्ट्स या संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामना सुनील एन्टरप्रायझेस वि. स्वराज स्पोर्ट्स यांच्यात झाला. या सामन्यात सुनील एन्टरप्रायझेसने 5 गुणांनी विजय मिळविला. दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मार्ट ग्रुप संघाने पिरनवाडी योद्धा संघाचा 3 गुणानी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना सुनील एन्टरप्रायझेस व स्मार्ट ग्रुप यांच्यात झाला. या सामन्याचे उद्घाटन सुरज पाटील व सतीश पाटील, सचिन गोरले, एएसआय मल्लीकार्जुन तळवार, सुभेदार चंद्रकांत कडोलकर, शिवाजी शहापूरकर, मल्लाप्पा पाटील, जोतिबा लोहार, पिराजी मुचंडीकर, सुरेश सनदी, केशव पोळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सामन्यात पहिल्या सत्रात स्मार्ट ग्रुपने मोठी आघाडी घेतली होती. पण दुसऱया सत्रात आपल्या अनुभवाच्या जोरावर मुसंडी मारत 2 गुणांनी विजय संपादन करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या अंतिम सामन्यात बालिका आदर्श टिळकवाडी संघाने पिरनवाडी महिला संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या सुनिल एन्टरप्रायझेस संघाला रोख 31 हजार रूपये, आकर्षक चषक व उपविजेत्या स्मार्ट ग्रुप संघाला 21 हजार रूपये रोख, व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ठ रायडर दीपक, उत्कृष्ठ डिफेंडर सुरज तर मालिकावीर म्हणून बसू यांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून एन. आर. पाटील, उमेश बेळगुंदकर, सुनील बेळगुंदकर यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैजनाथ पाटील, सुनिल कुरूपगोळ, गणेश मुचंडीकर, प्रशांत राऊत, नंदू नेसरकर, महेश पाटील, राकेश तारिहाळकर, शंकर शेखर मुचंडीकर, रवी पाटील, परशराम मलतवाडी, विशाल शहापूरकर, सूरज पाटील यांनी विशष परिश्रम घेतले.