वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या सुमित नागलचे अमेरिकन ओपन स्पर्धेतील आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले. डॉमिनिक थिएमने त्याला हरवून तिसरी फेरी गाठली. महिलांमध्ये तीन ‘मम्मी’नी तिसरी फेरी गाठली असून यात सेरेना विल्यम्स, व्हिक्टोरिया अझारेन्का व त्स्वेताना पिरोन्कोव्हा यांचा समावेश आहे. पिरोन्कोव्हाने धक्कादायक निकाल नोंदवताना गार्बिन मुगुरुझाचा पराभव केला.
पुरुषांमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेला तिसरी फेरी गाठण्यात अपयश आले तर नोव्हॅक जोकोविच, डॅनील मेदवेदेव यांनी तर महिलांमध्ये सोफिया केनिन, सोराना सिर्स्टिया, अमांदा ऍनिसिमोव्हा यांनी तिसऱया फेरीत आगेकूच केली. मिलोस रेऑनिक व जोहाना कोन्टा यांना मात्र स्पर्धेबाहेर पडावे लागले.
सुमित नागल हा ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला खेळाडू बनला होता. पण दुसऱया फेरीत त्याला ऑस्ट्रियाच्या द्वितीय मानांकित थिएमकडून सरळ सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. थिएमने नागलवर 6-3, 6-3, 6-2 अशी मात केली. थिएमने नागलच्या सामन्यांच्या व्हिडिओज पाहून फोरहँड हे त्याचे बलस्थान असल्याचे जाणले होते. त्यामुळे त्याला फोरहँड खेळण्याची जास्त संधी मिळणार नाही, याची दक्षता थिएमने घेतली होती.
अग्रमानांकित जोकोविचने तिसरी फेरी गाठताना जॅन लेनार्ड स्ट्रूफचा पराभव केला. ब्रिटनच्या अँडी मरेला फेलिक्स ऑगर ऍलियासिमेकडून 2-6, 3-6, 4-6 त्याचप्रमाणे मिलोस रेऑनिकला व्हॅसेल पॉस्पिसिलकडून 6-7 (1-7), 6-3, 7-6 (7-4), 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
फ्रान्सच्या टायफोने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनवर 7-6 (8-6), 3-6, 1-6, 6-3, 6-3 अशा संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळविला.
याशिवाय ऍलेक्स डी मिनॉरने रिचर्ड गॅस्केटचा 6-4, 6-3, 6-7 (6-8), 7-5, मारिन सिलिकने नॉर्बर्ट गोम्बोसचा 6-3, 1-6, 7-6 (7-2), 7-5, डेनिस शॅपोव्हॅलोव्हने कोरियाच्या एस. क्वॉनचा 6-7 (5), 6-4, 6-4, 6-2, मेदवेदेवने ख्रिस्तोफर ओकॉनेलचा 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला.
सुपर ‘मॉम्स’ची आगेकूच
महिलांमध्ये तीन ‘सुपर मॉम्स’नी आगेकूच केली आहे. सेरेना विल्यम्सने मार्गारिटा गॅस्पारियनचा 6-2, 6-4 असा पराभव केला. पुढील फेरीत तिची लढत तिचीच देशवासी स्लोअन स्टीफेन्सशी होणार आहे. स्टीफेन्सने ओल्गा गोव्होर्त्सोव्हाचा 6-2, 6-2 असा पराभव केला. पिरोन्कोव्हाने तीन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्याच स्लॅममध्ये खेळताना तिसरी फेरी गाठताना दहाव्या मानांकित गार्बिन मुगुरुझाला स्पर्धेबाहेर घालविले. तिने ही लढत 7-5, 6-3 अशी जिंकली. आणखी एक मम व माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने बेलारुसच्या पाचव्या मानांकित ऍरीना साबालेन्कावर 6-1, 6-3 अशी सहज मात केली. या स्पर्धेत एकूण 9 मम्सनी भाग घेतला होता. त्यापैकी किम क्लिस्टर्स, व्होनारेव्हा, ताताना मारिया, कॅटरीना बोन्डारेन्को, पॅट्रिसिया मारिया टिक, गोव्होर्त्सोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
ब्रिटनच्या कोन्टाला सोराना सिर्स्टियाने 2-6, 7-6 (7-5), 6-4 असे नमविले तर सोफिया केनिनने लेलाह फर्नांडेझचा 6-4, 6-4 असा पराभव केला .