कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री विरेंद्रकुमार यांनी ‘पीएम-दक्ष पोर्टल आणि ऍप’ लाँच केले. मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱयांसाठीची कौशल्य विकास योजना सुलभ करण्यासाठी हे ऍप सुरु करण्यात आले आहे. आता कोणत्याही व्यक्तीला ‘पीएम-दक्ष’ पोर्टलवर जाऊन कौशल्य विकास प्रशिक्षणासंबंधी कोणतीही माहिती मिळवता येणार आहे. याव्यतिरिक्त केवळ एका क्लिकवरच, कोणीही आपल्या आजूबाजूला होणाऱया कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती मिळवू शकणार आहे. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही करता येणार आहे.
‘पंतप्रधान दक्ष आणि कुशल संपन्नता हितग्राही (पीएम-दक्ष) योजना’ सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाकडून लागू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत योग्य लोकांना यासंदर्भातील सर्व प्रशिक्षण दिले जाईल. या पोर्टलवर प्रशिक्षण संस्थेत नोंदणीची सुविधा आणि एखाद्याच्या आवडीच्या कार्यक्रमानुसार रजिस्ट्रेशनच्या सुविधेचा समावेश आहे. वैयक्तिक माहितीशी संबंधित इच्छित कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा, प्रशिक्षण कालावधी दरम्यान चेहरा आणि आय (डोळा) स्क्रिनिंगद्वारे आपली उपस्थिती नोंदवण्याची सुविधा आणि प्रशिक्षणादरम्यान फोटो आणि व्हिडीओ क्लिपद्वारे देखरेख इत्यादी सुविधांचा समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांनी सांगितले.
फायदेशीर ऍप पंतप्रधान कार्यक्षमता आणि कौशल्य संपन्न हितग्राही (पीएम-दक्ष) योजना सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाच्या वतीने 2020-21 पासून लागू करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लक्ष्य गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य सुधारणा, अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) प्रदान केले जाणार आहेत. यासाठीच पीएम-दक्ष पोर्टल आणि ऍप फायदेशीर ठरणार आहे.