पहिल्यांदाच जेतेपदाकडे वाटचाल, लीपझिगवर 3-0 गोल्सनी मात
वृत्तसंस्था/ लिस्बन
पॅरिस सेंट जर्मेन संघाने पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्यांनी उपांत्य सामन्यात आरबी लीपझिगचा 3-0 असा पराभव केला.
मार्किन्होज व अँजेल डि मारिया यांनी गोल नोंदवून पीएसजीला मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि उत्तरार्धात 56 व्या मिनिटाला जुआन बर्नाटने संघाचा तिसरा गोल नोंदवला. 1970 मध्ये स्थापित झालेल्या या प्रेंच क्लबचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून बायर्न म्युनिच व ऑलिम्पिक लियोनेस यांच्यातील विजयी संघाविरुद्ध त्यांची जेतेपदाची लढत होईल. मागील तीन वर्षे बाद फेरीतच हा संघ बाहेर पडत असल्यामुळे मानसिक दडपणासमोर ते खचत असल्याची त्यांच्यावर टीका होत होती. पण यावेळी हा अडथळा पार करीत त्यांनी जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली.
पीएसजीला रेड बुल या एनर्जी ड्रिंक बनविणाऱया कंपनीकडून आर्थिक पाठबळ मिळत असून त्यांनी सर्वांचा अपेक्षाभंग करीत शेवटच्या चार टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. हा टप्पा गाठताना त्यांनी टॉटनहॅम हॉटस्पर, ऍटलेटिको माद्रिद यासारख्या बलाढय़ संघांना पराभूत केले. 13 व्या मिनिटाला नेमार व डि मारिया यांनी फ्री किक घेतली आणि डि मारियाने पुरविलेल्या क्रॉसवर मार्किन्होजने गोल नोंदवला. नंतर लीपझिगच्या गोलरक्षकाकडून झालेल्या चुकीचा लाभ घेत पॅरेडेसने चेंडूवर ताबा मिळविला आणि तो नेमारकडे सोपविला. त्याने बॅकहील फ्लिक करीत चेंडू डि मारियाला दिला, त्यावर त्याने गोल नोंदवत संघाची आघाडी वाढविली होती.
या प्रेंच क्लबने आतापर्यंत या स्पर्धेत 110 सामने खेळले असून इतके सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणारा हा पहिलाच संघ आहे. त्यांनी याआधीचा अर्सेनलचा 90 सामन्यांचा विक्रम मागे टाकला. यापूर्वी पीएसजीने 1996 युफा कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. युरोपियन कप जिंकणारा ऑलिम्पिक मार्सेली हा एकमेव प्रेंच संघ असून 1993 मध्ये त्यांनी एसी मिलानचा पराभव करून हे यश मिळविले होते. त्यांच्या पंक्तीत बसण्याची संधी आता पीएसजीला मिळाली आहे.