मूर्तिकार संभ्रमावस्थेत; ऐनवेळी पीओपी बंदीचा बडगा नको
प्रतिनिधी/ बेळगाव
जल प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून मागील अनेक वर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. परंतु याबाबत ठोस अंमलबजावणी नसल्यामुळे काही मूर्तिकार मातीच्या तर काही मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करीत आहेत. ऐनवेळी प्रशासनाकडून बंदीचे आदेश देण्यात येत असल्यामुळे मूर्तिकारांच्या मूर्ती जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे यावषी तरी असा गोंधळ टाळून प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.
बेळगाव शहर व परिसरात 70 ते 75 मूर्तिकार दरवषी हजारो गणेशमूर्ती तयार करतात. या मूर्ती हुबळी, धारवाड, गदग, गोवा, तसेच पश्चिम महाराष्ट्रात पाठविल्या जातात. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून घरगुती गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले जाते. शाडू तसेच मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यास वेळ व पैसा अधिक जात असल्यामुळे मूर्तिकार पीओपीकडे वळले आहेत. काही तासात पीओपी गणेशमूर्ती तयार केली जाते. परंतु यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे केंद्र सरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे.
बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने मातीच्या मूर्तीही तयार केल्या जातात. या मूर्ती वजनाने काहीशा जड व किमतीही जास्त असतात. परंतु पीओपी मूर्तीची किंमत कमी असल्यामुळे ग्राहकांची पसंती पीओपीला असते. एकीकडे ग्राहक तर दुसरीकडे प्रशासनाचा धरसोडपणा या विवंचनेत मूर्तिकार अडकले आहेत. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ातच संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मग कोल्हापूरच्या मूर्तींवर बंदी का नाही
बेळगावमध्ये अनेक मूर्तिकार घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करतात. मध्यंतरी प्रशासनाने पीओपीच्या मूर्तींबाबत कठोर कारवाई केल्यामुळे बेळगावमधील मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. परंतु गणेशोत्सवासाठी काही दिवस असतानाच राजकीय दबाव आणत कोल्हापूर तसेच इतर भागातून पीओपी मूर्ती बेळगावमध्ये आणण्यात आल्या. मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपी मूर्तींची किंमत तुलनेने अत्यल्प असल्यामुळे त्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात झाली. याचा फटका स्थानिक मूर्तिकारांना बसला होता.
महामंडळांनी पुढे येण्याची गरज
बेळगावमधील गणेशोत्सवाला 100 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या ठिकाणी नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार केल्या जातात. परंतु मूर्ती मातीच्या की पीओपीच्या या वादामध्ये मूर्तिकार अडकत आहेत. पीओपी मूर्ती केल्याबद्दल मूर्तीही जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची ही समस्या सोडविण्यासाठी बेळगावमधील गणेशोत्सव महामंडळांनी एकत्रित येऊन प्रशासनाला भूमिका जाहीर करण्यासाठी भाग पाडण्याची गरज निर्माण झाली आहे.