वृत्तसंस्था/ टेक्सास
कोरोना महामारी संकटामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व गोल्फ स्पर्धा तहकूब करण्यात आल्या होत्या. आता पुढील आठवडय़ात पीजीए टूरवरील गोल्फ स्पर्धा येथे भरविली जाणार आहे. या स्पर्धेत अमेरिकेचा अव्वल दर्जाचा गोल्फपटू तसेच 15 वेळा विश्व चॅम्पियनशीप जिंकणारा टायगर वूड्स सहभागी होणार नाही.
टेक्सासमध्ये पुढील आठवडय़ात होणाऱया पीजीए टूरवरील चार्ल्स चॅलेंज आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत जगातील पाच अव्वल गोल्फपटूंनी सहभागी होत असल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले. 1997 साली या स्पर्धेत अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्स याचा सहभाग होता. गेल्या मार्चच्या मध्यंतराला कोरोना महामारी संकटामुळे पीजीए टूरवरील सर्व गोल्फ स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या.
44 वषीय मास्टर्स चॅम्पियन टायगर वूड्सने गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पीजीए टूरवरील गोल्फ स्पर्धेत शेवटचा सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत टायगर वूड्सची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्याने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक गोल्फ कारकीर्दीत पीजीए टूरवरील विक्रमी 83 गोल्फ स्पर्धा जिंकल्या आहेत.