नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीपीएफ, ज्येष्ठ नागरीक योजना, एनएससी प्रमाणपत्र इत्यादी अल्पबचत योजनांवर दिल्या जाणाऱया व्याजात कपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावर विचार करत असून येत्या तिमाहीसाठी ही कपात केली जाईल अशी चिन्हे आहेत. ईपीएफ योजनेतील निधीवर यापूर्वीच व्याजदर घटविण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीसाठी, अर्थात, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांसाठी ही व्याजदर कपात केली जाणार असे बोलले जात आहे. या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजदराचे अवलोकन दर तीन महिन्यांनी केले जाते. सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट बचत योजना, 5 वर्षांचे पोस्ट रिकरिंग डिपॉझिट इत्यादी योजनांवरील व्याजदरही घटविले जाण्याची शक्यता आहे.