वृत्त संस्था/ बाली
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुचे येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. थायलंडच्या इटेनॉनने सिंधूचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत सातव्या स्थानावरील पीव्ही सिंधूला शनिवारी उपांत्य लढतीत थायलंडच्या माजी विश्वविजेत्या इटेनॉनने पराभूत केले. आठव्या मानांकित थायलंडच्या इटेनॉनने सिंधूचा 54 मिनिटांच्या कालावधीत 15-21, 21-9, 21-14 असा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. विद्यमान विश्वविजेती सिंधूने स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत यापूर्वी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. गेल्या आठवडय़ात इडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने उपांत्य फेरी तसेच ऑक्टोबर महिन्यातील प्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.