स्पेनमध्ये आजपासून बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ,
वृत्तसंस्था / हुलेव्हा (स्पेन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरूष आणि महिलांच्या विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेला रविवारपासून येथे प्रारंभ होत आहे. भारताची 26 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे या स्पर्धेतील आपले जेतेपद राखण्यावर लक्ष राहील.
2021 बॅडमिंटन हंगामात सिंधूची कामगिरी समाधानकारक झाली असून तिने या हंगामातील अखेरीस झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रौप्यपदक मिळविले. या हंगामात सिंधूने दोन रौप्यपदकांची कमाई केली. सिंधूने प्रेंच खुल्या, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
दोन वर्षांपूर्वी स्विसमधील बॅसिल येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते. आता ती रविवारपासून सुरू होणाऱया स्पर्धेत हे जेतेपद स्वतःकडे राखण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्ड चॅम्पियनशिपचे तीनवेळा विजेतेपद मिळविणारी स्पेनची कॅरोलिना मॅरिन, 2017 मधील विजेती जपानची नाझोमी ओकुहारा, 2015 साली रौप्यपदक मिळविणारी भारताची सायना नेहवाल या अव्वल खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली.
सायनाने दुखापतीमुळे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत सिंधूला नवव्या मानांकित थायलंडची चोचूवाँग, चीन तैपेईची टॉप सीडेड तेई याँग आणि कोरियाच्या सेयाँगकडून कडवा प्रतिकार होवू शकेल. अलीकडेच कोरियाच्या सेयाँगने इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपदे मिळविली आहेत. तसेच तिने पहिल्यांदाच विश्व टूर अंतिम बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद पटकाविले आहे. कोरियाला विश्व टूर अंतिम स्पर्धेतील जेतेपद मिळवून देणारी सेयाँग ही पहिली बॅडमिंटनपटू आहे.
रविवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत पीव्ही सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. सिंधूचा या स्पर्धेतील पहिला सामना मार्टिना रिपेस्काविरुद्ध होणार आहे. हा सामना सिंधूने जिंकला तर पुढील फेरीत तिची लढत थायलंडच्या चोचुवाँगविरुद्ध होईल. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात चोचूवाँगने सिंधूचा पराभव केला होता. सिंधूने थायलंडच्या चोचूवाँगवर विजय मिळविला तर तिची त्यापुढील लढत चीन तैपेईच्या टॉप सीडेड तेई याँगविरुद्ध होऊ शकेल.
पुरूष एकेरीत भारताचा 12 वा मानांकित किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना स्पेनच्या पाबेलो ऍबियानविरुद्ध होणार आहे. साई प्रणितचा सलामीचा सामना हॉलंडच्या मार्क केलजाँविरुद्ध होईल. एचएस प्रणॉयची सलामीची लढत आठव्या मानांकित अँगसविरुद्ध होणार आहे. लक्ष्य सेनच्या सलामीच्या स्पर्धकाने माघार घेतली आहे. पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. महिला दुहेरीत भारताच्या एन सिक्की रेड्डी व अश्विनी पोनाप्पा यांनाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून त्यांचा दुसऱया फेरीतील सामना झुआन व तिंग यांच्याविरुद्ध होणार आहे.