जपानच्या यमागुचीचे आव्हान संपुष्टात
वृत्त संस्था/ बाली
इंडोनेशियात सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर अंतिम स्पर्धेत भारताची विद्यमान विश्वविजेती आणि सलग दोन ऑलिम्पिक पदक मिळविणाऱया पीव्ही सिंधूने महिला एकेरीची अंतिम फेरी गाठताना जपानच्या यमागुचीचे आव्हान संपुष्टात आणले.
शनिवारी येथे झालेल्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पीव्ही सिंधूने यमागुचीचा 21-15, 15-21, 21-19 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. 2021 बॅडमिंटन हंगामातील या शेवटच्या स्पर्धेत पीव्ही सिंधूने तिसऱयांदा अंतिम फेरी गाठली. 2018 साली सिंधूने या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात सातव्या स्थानावरील पीव्ही सिंधू आणि जपानची तृतीय मानांकित यमागुची यांच्यात आतापर्यंत 20 लढती झाल्या असून त्यामध्ये 12 लढती सिंधूने तर आठ लढती यमागुचीने जिंकल्या आहेत. विश्व बॅडमिंटन टूरवरील यापूर्वी झालेल्या प्रेंच, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धामध्ये सिंधूने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या मार्चमध्ये झालेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने उपविजेतेपद पटकाविले होते.